
- विशेष प्रतिनिधी
ठाणे जिल्ह्यातील वांगणी ग्रामीण रुग्णालयात (Hospital) बुरशीयुक्त आणि अप्रमाणित औषधे आढळल्याच्या गंभीर प्रकाराने अखेर विधानसभेत खळबळ उडवून दिली आहे. रुग्णांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या बेजबाबदार कारभाराची दखल घेत सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर (Prakashrao Abitkar) यांनी संबंधित अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले असून, दोषी आढळल्यास थेट निलंबनाची कारवाई करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे आरोग्य विभागात औषध खरेदीच्या नावाखाली सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराला चाप बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
(हेही वाचा – शिर्डी हुकली तरी ‘मैदान’ मारणार! निळ्या झेंड्याला दिल्लीच्या तख्तावर नेण्यासाठी Ramdas Athawale यांनी शड्डू ठोकला)
वांगणी रुग्णालयात (Hospital) पुरवण्यात आलेली औषधे निकृष्ट असल्याचा मुद्दा आमदार मोहन मते (Mohan Mate) आणि किसन कथोरे (Kisan Kathore) यांनी विधानसभेत लावून धरला होता. यावर उत्तर देताना आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, जरी स्थानिक तपासणीत बुरशी आढळली नसल्याचा दावा केला जात असला, तरी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) ही औषधे इतर निकषांनुसार ‘अप्रमाणित’ ठरवली आहेत. विशेष म्हणजे, या निकृष्ट औषधांना आधी ‘योग्य’ ठरवणाऱ्या खासगी प्रयोगशाळेवरही सरकारने आता सर्जिकल स्ट्राईक केला असून, तिला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकले जाणार आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून झालेल्या या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. भविष्यात असे जीवघेणे प्रकार घडू नयेत, यासाठी सरकार आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेणार आहे. लवकरच औषधांची गुणवत्ता जागेवरच तपासण्यासाठी ‘ड्रग डिटेक्शन मशीन’चा वापर केला जाईल, अशी ग्वाही आबिटकर यांनी दिली. तसेच वांगणी रुग्णालयाच्या (Hospital) दर्जोन्नतीसाठी सरकार सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता या चौकशीच्या फेऱ्यात नेमके कोणते मोठे मासे अडकतात, याकडे ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
