Governor Ramesh Bais : समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघाताचा राज्यपालांनी व्यक्त केला शोक

196
Governor Ramesh Bais : समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघाताचा राज्यपालांनी व्यक्त केला शोक
Governor Ramesh Bais : समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघाताचा राज्यपालांनी व्यक्त केला शोक

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर खासगी बसच्या झालेल्या भीषण अपघाताबद्दल राज्यपाल रमेश बैस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. पिंपळखुटा येथे खासगी बसला अपघात होऊन काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त हृदय पिळवटून टाकणारे आहे. दुर्घटनेतील सर्व मृत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपल्या तीव्र शोकसंवेदना मृतांच्या आप्तेष्टांना कळवतो. या अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना लवकर बरे वाटावे, ही प्रार्थना करतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.

सरकारने अपघाताची गंभीर दखल घ्यावी : शरद पवार

या दुर्दैवी घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील खासगी वाहनांच्या वेगमर्यादेचा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत राज्य सरकारने गंभीर दखल घेत त्वरित उपाययोजना करायला हव्यात. एक आठवड्यापूर्वीच संबंधित विभागाकडून होत असलेल्या अपघातांची आकडेवारी मागवून चिंता व्यक्त केली होती. अपघात रोखणाच्या दृष्टीने तातडीच्या उपाययोजना कराव्यात असे सुचवले होते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

आता तरी सरकारचे डोळे उघडावेत : उद्धव ठाकरे

बुलढाणा येथे समृध्दी महामार्गावर एका बसला भीषण अपघात होऊन त्यात २६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे वृत्त मन हेलावणारे आहे. गेल्या वर्षभरात या महामार्गावर असे अपघात सुरुच आहेत. आतापर्यंत ३०० हून जास्त प्रवासी त्यात मरण पावले. सरकारने अपघात टाळण्यासाठी काहीच उपाय योजना केल्या नाहीत. बुलढाण्यातील अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत. अपघातात जीव गमावलेल्या अभागी जीवांना मी श्रध्दांजली अर्पण करतो, असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

अपघातांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी उपाययोजना आवश्यक : अजित पवार

नागपूरहून पुण्याला येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसला समृध्दी महामार्गावर अपघात होऊन २५ हून अधिक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद, वेदनादायी आहे. या भीषण दुर्घटनेनंतर समृध्दी महामार्गावरील वाहनांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा प्रकर्षाने ऐरणीवर आला आहे. अशा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्य सरकारने तज्ञांच्या सल्ल्याने यावर तात्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले आहे.

समृद्धी महामार्गावर सुरुवातीपासून अपघातांची मालिका सुरु आहे. समृद्धी महामार्गाच्या सदोष निर्मितीमुळे आणि मानवी त्रुटींमुळे हे अपघात घडत असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी विरोधी पक्षांच्यावतीने सातत्याने करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारने आतातरी या मागणीचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणीही अजित पवार यांनी केली आहे. दरम्यान, आजचा दुर्दैवी प्रसंग लक्षात घेऊन अजित पवार यांनी शनिवारचे आपले सर्व कार्यक्रम रद्द केले.

कठोर नियम गरजेचे : जयंत पाटील

समृद्धी महामार्गावर सातत्याने होणारे अपघात हा कळीचा मुद्दा बनला आहे. खासगी वाहनांची सुव्यवस्था आणि वेग मर्यादा यावर सरकारने कठोर नियम करणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.

(हेही वाचा – समृद्धी महामार्गावरील अपघातांचा तज्ज्ञांमार्फत अभ्यास करणार – मुख्यमंत्री)

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पावले उचला : बाळासाहेब थोरात

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे समृद्धी महामार्गावर अपघातानंतर पेट घेतलेल्या खासगी बसमधील प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत धक्कादायक आणि दु:खद असल्याचे नमूद करत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी समृद्धी महामार्ग मृत्यूचा सापळा बनल्याची टीका करत या महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.

अपघात रोखण्यासाठी प्रयत्न व्हावेत : राज ठाकरे

समृद्धी महामार्गांवर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. खासगी ट्रॅव्हल्सच्या गाड्यांचे ड्रायव्हर्स आणि ट्र्क ड्रायव्हर तर कमालीच्या बेदरकारीने गाड्या चालवतात. ह्यांच्यावर चाप बसवायलाच हवा. अशा अपघातांच्या घटना परत कधीच होणार नाहीत ह्यासाठी आता प्रयत्न व्हायलाच हवेत, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.