समृद्धी महामार्गावरील अपघातांचा तज्ज्ञांमार्फत अभ्यास करणार – मुख्यमंत्री

186
समृद्धी महामार्गावरील अपघातांचा तज्ज्ञांमार्फत अभ्यास करणार - मुख्यमंत्री

समृद्धी महामार्गाचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी तज्ज्ञांमार्फत अभ्यास करण्यात येईल. त्यांच्या सूचनानुसार उपाययोजना प्राधान्याने अमलात आणण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

समृद्धी महामार्गावरील देऊळगाव राजानजिक खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचा अपघात रात्री दोन वाजता झाला. यात २६ जणांचा मृत्यू, तर आठ जण जखमी झाले आहेत. या अपघातस्थळाला मुख्यमंत्री शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत भेट दिली. यावेळी मंत्री गिरीश महाजन, संदिपान भुमरे, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.

(हेही वाचा –  Samriddhi Highway Accident : ड्रायव्हर, क्लिनरला पोलिसांनी घेतले ताब्यात)

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, समृद्धी महामार्गावरील अपघात अतिवेग आणि वाहनचालकांना झोपेची डुलकी आदी कारणामुळे घडतात. असे अपघात घडू नये यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. अपघात रोखण्यासाठी ज्या ज्या उपायोजना करणे गरजेचे आहे, त्या शासन स्तरावरून गांभीर्यपूर्वक व प्राधान्याने करण्यात येतील. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक यंत्रणा अपघातस्थळी पोहोचली. बसचा मुख्य दरवाजा बंद असल्यामुळे प्रवाशांना बाहेर येता आले नाही. त्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ झाली. खासगी प्रवासी वाहतुकीमध्ये जादा प्रवासी वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध  कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

समृद्धी महामार्गावर येणारी वाहतूक नियंत्रित करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित आहे. महामार्गावर प्रवेश देण्याआधी वाहनांची तपासणी केली जाते. तसेच वाहनचालकाला समुपदेशन केले जाते. वाहन किंवा वाहनचालक योग्य पात्रतेचे नसल्यास त्यांना परत पाठवले जाते. त्यामुळे प्रवाशांची आणि वाहनचालकांची नाराजी होते. मात्र सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून नियमांचे काटेकोर पालन करून  वाहतूक नियंत्रण केले जात आहे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, अपघातस्थळाला भेट दिल्यानंतर शिंदे आणि फडणवीस यांनी देऊळगाव राजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आठ जखमींची भेट घेऊन आस्थेने विचारपूस केली. अपघातातील जखमींना योग्य तो उपचार करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.