काँग्रेसकडून गोव्याची प्रतिमा मलीन, टीएमसी हिंदू विरोधी, आप खोटारडी!

109

भाजपने गोवा विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 34 उमेदवारांची यादी गुरुवारी जाहीर केली, त्यापैकी 9 उमेदवार हे अल्पसंख्यांक समाजाचे आहेत. निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यावेळी फडणवीस यांनी एकाच वेळी काँग्रेससह टीएमसी आणि आप या तिन्ही पक्षांवर तीव्र शब्दांत आगपाखड केली.

काँग्रेसने गोव्याची प्रतिष्ठा धुळीला मिळवली

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, इतर पक्ष केवळ भाजपशी संघर्ष करत आहेत. या पक्षांचा इतिहास पाहा. काँग्रेसने अनेक वर्ष गोव्यावर राज्य केलं. 2007 ते 2012 च्या सत्ता काळात काँग्रेसने मोठे घोटाळे केले. गोव्याची प्रतिष्ठा धुळीला मिळवली. त्यांना सत्ता केवळ लुटण्यासाठी हवी आहे. पैसे कमावणारी फॅक्ट्री करण्यासाठी काँग्रेसला गोव्याची सत्ता हवी आहे. गोव्यातील अनेक काँग्रेस नेत्यांनी पक्ष सोडला आहे. काँग्रेसची विश्वासाहर्ता संपल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

टीएमसी अँटी हिंदू 

तृणमूल गोव्यात आली. त्यांनी एमजीपीसोबत आघाडी केली. गोव्याने टीएमसीची आक्रमकता नाकारली आहे. टीएमसी सुटकेस घेऊन आली आहे. सुटकेसच्या भरवशावर त्यांनी राजकारण सुरू केलं आहे. त्यांचा स्टँड अँटी हिंदू आणि अँटी काँग्रेस आहे. बंगालच्या निवडणुकीनंतर लोकांना ही  पार्टी योग्य वाटत नाही. टीएमसी आणि एमजीपीच्या युतीमुळे एमजीपीचे नेते अस्वस्थ आहेत. काही एमजीपी नेत्यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आणि काहींनी पक्ष सोडला. ही युती लोकांना भावली नसल्याचा दावा फडणवीसांनी केला.

( हेही वाचा :आता लवकरच मेडिकलमध्येही मिळणार कोरोना लस! )

आप फक्त खोटं बोलते

गोव्यात आप आली आहे. आप केवळ सकाळापासून संध्याकाळपर्यंत खोटं बोलत आहे. लोक या पक्षांना नाकारत आहेत. दिल्लीत परिस्थिती काय आहे, हे लोकांनी पाहिलं आहे. जगमगाती बिजली का नारा, असं केजरीवाल म्हणाले होते. पण वीज मिळाली नाही. इथे वारंवार बत्तीगुल होत आहे. लोकांना सबसिडी मिळत नाही. दिल्लीत पाणीपुरवठ्याची समस्या आहे. हर घर नल, ही मोदींची योजना त्यांनी अंमलात आणली. त्यात केजरीवाल सरकारचं योगदान नाही. मोहल्ला क्लिनिकचा गवगवा केला. त्यातील निश्चित आकडेवारी त्यांना गाठता आली नाही. मार्चमध्ये 220 मोहल्ला क्लिनिक बंद होते. कोरोना काळात या मोहल्ला क्लिनिकचा काहीच फायदा झाला नाही. गोव्यात आपने अनेक आश्वासन दिले. लोकांना त्यांचं सत्य माहीत आहे, असा दावा फडणवीसांनी केला.

उत्पल पर्रिकरांशी चर्चा सुरू 

पणजीत जे विद्यमान आमदार आहेत त्यांनाच उमेदवारी दिली आहे. उत्पल पर्रिकर आणि पर्रिकरांचा परिवाह हा आमचा आहे, ते आमचे जवळील आहेत. आम्ही उत्पल पर्रिकर यांना दोन जागांचा पर्याय दिला होता. त्या दोन जागांपैकी एका जागेला त्यांनी यापूर्वीच नकार दिला होता दुसऱ्या जागेच्या संदर्भात चर्चा सुरू आहे. भाजपने पर्रिकरांच्या कुटुंबाचा नेहमीच सन्मान केला आहे, असे फडणवीस म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.