गणेश नाईक अडचणीत, नाईकांच्या वाड्यात चालला काय?

125
राष्ट्रवादीतून बाहेर पडून भाजपमध्ये स्थिरावलेले गणेश नाईक अचानक चर्चेत आले आहेत. याला कारणही विशेष आहे. त्यांच्या विरोधात एका महिलेने लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला आहे. त्या महिलेने यासंबंधी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. त्याची दखल घेत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुढच्या ४८ तासांत यासंबंधीचा चौकशी अहवाल सादर करण्याचा आदेश पोलिसांना दिला आहे.

नाईकांना अटक होण्याची शक्यता 

या प्रकरणामुळे गणेश नाईक यांच्या अडचणी वाढल्या आहे, कदाचित त्यांना याप्रकरणी तात्काळ अटक करण्याची कार्यवाही देखील केली जाईल, असे चाकणकर यांनी सांगितले. नवी मुंबईतील एका महिलेने आठवड्याभरापूर्वी गणेश नाईक यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. १९९३ पासून गणेश लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप संबंधित महिलेने केला. नाईक आपल्यालानर्सच्या वेशात नाचायला लावायचे, नाही नाचले तर मारहाण करायचे, असे त्या महिलेने तक्रारीत म्हटले. तसेच आपल्याला या संबंधातून पंधरा वर्षांचा मुलगा असल्याचे महिलेने म्हटले आहे. तशी रितसर तक्रार तिने पोलिसांकडे केली होती. परंतु पोलिसांनी तक्रार देऊनही कारवाई केली नसल्याने संबंधित महिलेने महिला आयोगाकडे न्यायासाठी धाव घेतली.

काय म्हणाल्या रुपाली चाकणकर?

नवी मुंबई पोलीस ठाण्यात गणेश नाईक यांच्याविरोधात आयपीसी 506 ब अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. 16 एप्रिलला नेरुळ पोलीस ठाण्यात आयपीसी 376 अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. दोन्ही पोलीस ठाण्याला दाखल झालेले गुन्हा हे गंभीर स्वरुपाचे असून गणेश नाईक यांना अटक करुन पुढील कारवाई केली जाईल, असे रुपाली चाकणकर यांनी सांगितले आहे. एका महिलेसोबत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर झालेल्या अपत्याचा स्वीकार न करणारे भाजप नेते आणि आमदार गणेश नाईक यांच्यावर पीडितेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसापूर्वी या महिलेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती, त्याप्रकरणी आयोगाने नवी मुंबई पोलिसांना यावर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.