‘तो’ दसरा मेळावा आजही चर्चेत…

103

शिवसेनेत फूट पडली आणि आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाची ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे दोन पक्ष झाले आहेत. शिवसेनेची परंपरा म्हणजे दसरा मेळावा, शिवसेनेची स्थापना झाल्यापासून एकच नेता, एकच मैदान, एकच पक्ष आणि एकच विचार, अशी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची ओळख बनली होती. अवघ्या महाराष्ट्रात मराठी माणसांमध्ये स्वत्व जागृत करणाऱ्या शिवसेनेने जे जनआंदोलन उभे केले, त्यामागे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचार प्रभावी होते. या मेळाव्याची मुहूर्तमेढ ३० ऑक्टोबर १९६५ रोजी रोवली गेली. शिवाजी पार्कात याच दिवशी पहिला दसरा मेळावा झाला होता.

दसरा मेळाव्यामागील संकल्पना 

शिवसेनेने पक्षाच्या स्थापनेपासूनच दसरा मेळाव्याची परंपरा जपली आहे. पहिल्या मेळाव्याला आता जवळपास ५६ वर्षे लोटली आहेत. दोन ते तीन वर्षे वगळता १९६६ पासून ५६ वर्षे याच मैदानावर याच पक्षाचा म्हणजे शिवसेनेचा हा वार्षिकोत्सव प्रचंड उत्साहात होत आला आहे. १९८५ च्या सुमारास खूप पाऊस पडल्याने मैदान चिखलाने भरले होते आणि २००९ व २०१४ मध्ये निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे मेळावे होऊ शकले नव्हते. विशेष म्हणजे शिवसेनेच्या ज्या दसरा मेळाव्याची परंपरा सांगितली जाते, तो त्याचा पहिला मेळावा मुळात दसऱ्याच्या दिवशी झालाच नव्हता. त्यापूर्वी १९ जून रोजी ‘कदम मॅन्शन’ या ठाकरे कुटुंबाच्या निवासस्थानी श्रीफळ वाढवून शिवसेनेची स्थापना झाली होती. मुंबईतील मराठी माणसे नोकऱ्यांपासून कशी दूर फेकली गेली आहेत, याच्या याद्याच ‘मार्मिक’मध्ये ‘वाचा आणि थंड बसा’ या शीर्षकाखाली दर आठवड्याला प्रसिद्ध झाल्या आणि खळबळ उडाली. लोक बाळासाहेबांना भेटून संताप व्यक्त करू लागले. याची दखल घेऊन बाळासाहेबांनी आणखी कंपन्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या. मात्र आता शीर्षक बदलून ‘वाचा आणि उठा’ असे केले होते. या याद्यांमध्ये बहुतेक परप्रांतीय आणि औषधाला एखाददुसरे नाव मराठी असे. असंतोष आणखी वाढला. घरातील व घराबाहेरील वाढती गर्दी पाहून प्रबोधनकारांनी बाळासाहेबांना विचारले- ‘‘या गर्दीला आकार उकार देण्यासाठी काही संघटना वगैरे काढण्याचा विचार आहे की नाही?’’ बाळासाहेब म्हणाले, ‘‘मी तोच विचार करत आहे!’’ त्यावर प्रबोधनकार म्हणाले, ‘‘संघटना काढणार असाल तर नाव मी सुचवतो- आणि ते नाव असले पाहिजे – शिवसेना!’’ मग मुहूर्त वगैरे न पाहता घरातील व घराबाहेर जमलेल्या काही लोकांच्या उपस्थितीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय!’ अशी घोषणा देत सहदेव नाईक यांच्या हस्ते शिवसेनेच्या स्थापनेचा नारळ फुटला. ‘मार्मिक’च्या पुढच्याच अंकात शिवसैनिक नोंदणीची घोषणा देण्यात आली. २५ पैशांना एक असे नोंदणी अर्ज वाटण्यात आले. अर्ज कमी पडू लागले, एवढी मागणी होती. मग प्रत्येकाला थोडे थोडे अर्ज दिले जाऊ लागले. आम्ही गोरेगावच्या काही जणांनी अर्जाचे नमुने आणले.

(हेही वाचा कर्नाटकात २०० उर्दू शाळा नियमबाह्य पद्धतीने सुरु)

आणि ‘बाळ’ महाराष्ट्राला अर्पण केला 

संघटनेची माहिती देण्यासाठी एखादा मेळावा घ्यावा, अशी चर्चा झाली. दसऱ्याचा दिवसही ठरला. पहिलीच सभा असल्यामुळे ती मैदानाऐवजी सभागृहात घ्यावी, असे बाळासाहेबांच्या काही सहकाऱ्यांचे म्हणणे होते, मात्र ही सभा मैदानातच होईल, यावर बाळासाहेब ठाम राहिले. शिवाजी पार्कमध्ये सभा घेण्याची तयारी सुरू झाली. पण काही कारणास्तव दसऱ्याला म्हणजे २० ऑक्टोबरला सभा होऊ शकली नाही. फार विलंब नको म्हणून ३० ऑक्टोबर हा दिवस ठरला. आणि शिवतीर्थावर अक्षरश: जगसागर लोटला. सभेची सुरुवात शाहीर साबळे यांच्या ‘महाराष्ट्र गीता’ने झाली. त्यानंतर बॅ. रामराव आदिक, एस.ए. रानडे आणि अ‍ॅड. बळवंत मंत्री यांची भाषणे झाली. मग प्रबोधनकारांचे भाषण झाले. ते बहुतेक खुर्चीत बसूनच बोलले. महाराष्ट्राची आणि खास करून मुंबईतील मराठी माणसाची दयनीय अवस्था यावर त्यांनी परखड भाषेत कोरडे ओढले. ‘आता अन्यायाविरुद्ध लढा उभारा’ अशी हाक देऊन ते म्हणाले ‘आतापर्यंत ठाकरे कुटुंबात असलेला हा बाळ मी आज महाराष्ट्राला अर्पण करत आहे!’ प्रबोधनकारांच्या त्या शब्दांनी सर्वाच्या अंगावर रोमांच उभे राहिले. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असेपर्यंत २०१२पर्यंत दसरा मेळाव्यात प्रखर विचार मांडले गेले पण त्यानंतर दसरा मेळाव्यात तितका स्पार्क दिसला नाही.

(हेही वाचा श्रीक्षेत्र जांबमधून देवतांच्या मूर्ती चोरणारे आरोपी निघाले धर्मांध मुस्लिम )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.