चित्रपट आणि नाट्यक्षेत्राला मिळणार उद्योगाचा दर्जा; मंत्री Uday Samant यांची घोषणा

28
Uday Samant : बॉलिवुड, मॉलीवुड, टॉलिवुड आणि मराठी नाट्यक्षेत्राला न्याय मिळवून देण्‍यासाठी व रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी उद्योगाचा दर्जा देण्‍यात येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते त्‍यांसदर्भात महाराष्ट्र दिनी, 1 मे रोजी घोषणा करण्‍यात येईल, अशी माहितीवजा घोषणा मराठी भाषा विभागाचे मंत्री आणि नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांनी केली. (Uday Samant)

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या (Akhil Bharatiy Marathi Natya Parishad) शंभराव्या विभागीय नाट्यसंमेलनाच्या समारोप प्रसंगी मंत्री उदय सामंत बोलत होते. यावेळी उदय सामंत म्हणाले की, मराठी भाषा केवळ दर्जा देऊन अभिजात ठरत नाही. नाट्यकर्मी, लेखक, दिग्दर्शक जे प्रयोग करतात ते अभिजातच असते. त्यांचे कर्तृत्व, त्यांची नाटके नव्या पिढीसाठी पुनर्जिवित करण्यात यावी, हा ठेवा जतन करावा, असे आवाहन त्‍यांनी केले. त्याचप्रमाणे नाट्य व चित्रपटक्षेत्रातील कलावंत, तंत्रज्ञ यांना रोजगार व त्यांच्यासाठी कल्याणकारी उपक्रम राबविण्यासाठी नाट्यपरिषदेने पुढाकार घ्यावा, असेही आवाहन त्‍यांनीकेले. आगामी काळात रंगभूमी गाजविणारे कलावंत आणि तंत्रज्ञ यांना प्रत्येकी पाच- पाच म्हणजे एकूण दहा घरे उपलब्ध करुन देण्याचा मानस शासनाचा असल्याचेही ते म्‍हणाले.  यावेळी शतकी नाट्य संमेलन उत्कृष्टरित्या आयोजित केल्याबद्दल नागपूर शाखेचे कौतुक केले. तसेच काही सूचनाही केल्या.

ज्‍येष्‍ठ कलावंतांचा सत्‍कार
ज्येष्ठ रंगकर्मी मधू जोशी, प्रभाकर आंबोणे, श्रध्दा तेलंग, बापू चनाखेकर, शोभा जोगदेव, डॉ. रंजन दारव्हेकर, डॉ. विजय वैद्य, सुरेश घड्याळपाटील, प्रकाश एदलाबादकर, विजय जथे, संजय वलीवकर, वत्सला पोलकमवार, दयानंद चंदनवाले, मीना देशपांडे व सचिन कुंभारे या ज्‍येष्‍ठ कलावंतांचा उदय सामंत यांच्‍या हस्ते सत्कार करण्यात आला. यासोबतच स्व. गणेश नायडू स्मृती कला स्पर्धेतील विजेते वामन तुळसकर, रुक्मिणी दिक्षीत, तुषार राउत यांना पुरस्कृत करण्यात आले. सूत्रसंचालन अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांनी तर आभार प्रदर्शन अजय पाटील यांनी केले.

मराठी नाटक समाजाचे दर्पण : नितीन गडकरी
मराठी नाट्य संस्कृती सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. नाट्यक्षेत्राने मागील शंभर वर्षात मराठी मनांवर एक अमिट छाप उमटवली आहे. आजही ती कायम आहे. त्यामुळे मराठी नाटक समाजाचे दर्पण असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी अरुणाचल प्रदेश येथून दृकश्राव्य संदेशाद्वारे केले. याप्रसंगी व्यासपीठावर संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल (Dr. Jabbar Patel), मध्यवर्तीचे उपाध्यक्ष नरेश गडेकर, नागपूर शाखेचे अध्यक्ष अजय पाटील, संजय रहाटे यांच्यासह सर्व शाखांचे अध्यक्ष, मध्यवर्तीचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.