- विशेष प्रतिनिधी
राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याविषयी सोशल मीडियावर करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह टिप्पणीवरून राज्यातील राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काँग्रेसवर (Congress) जोरदार हल्लाबोल करत महिलांचा अपमान करणारी भाषा महाराष्ट्र कधीही सहन करणार नसल्याचा इशारा दिला.
मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले की, राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यांचा अवमान म्हणजे केवळ एका व्यक्तीचा नव्हे, तर महाराष्ट्रातील सर्व माता-भगिनी आणि महिलांच्या सन्मानावर आघात आहे. राजकीय मतभेद असू शकतात, मात्र त्यासाठी महिलांचा अवमान करणारी भाषा वापरणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी काँग्रेसच्या (Congress) भूमिकेवर कठोर शब्दांत टीका केली. महिलांच्या सन्मानाचा दावा करणाऱ्या पक्षाकडून अशा प्रकारची टिप्पणी होणे दुर्दैवी असल्याचे सांगत, राजकारण करताना सभ्यतेच्या मर्यादा पाळल्या पाहिजेत, असे त्यांनी नमूद केले.
(हेही वाचा – Electricity Bill : शासकीय कार्यालयांसाठी संयुक्त वीज बिलिंग प्रणाली)
शिंदे म्हणाले की, सुनेत्रा पवार यांच्यावर टीका करण्याच्या नादात काँग्रेसने संपूर्ण महिला शक्तीचाच अपमान केला आहे. महाराष्ट्रातील महिला अशा प्रकारच्या वक्तव्याकडे गांभीर्याने पाहतील आणि त्याला योग्य वेळी उत्तर देतील, असा दावा त्यांनी केला.
‘लाडकी बहीण’ योजनेचा (Ladki Bahin Yojana) उल्लेख करत त्यांनी २०२४ च्या निवडणुकांची आठवण करून दिली. महिलांनी लोकशाही मार्गाने काँग्रेसला धडा शिकवला होता, असे सांगत महिलांचा अपमान करणाऱ्यांना जनता पुन्हा योग्य उत्तर देईल, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, पद्मश्री, माजी राज्यपाल आणि शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल शिंदे यांनी श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचे स्मरण केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

