एकनाथ खडसेंना शिवसेनेची ऑफर

100

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे हे गेल्या काही दिवसांपासून पक्षावर प्रचंड नाराज असून, त्यांनी आपली ही नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. मात्र आता एकनाथ खडसे यांना खुद्द शिवसेनेमध्ये येण्याची ऑफर देण्यात आली आहे. शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी खडसेंना शिवसेनेची ऑफर दिली आहे.

काय आहे ऑफर

एकनाथ खडसे यांच्यावर भाजपामध्ये खरंच अन्याय झाला आहे. त्यामुळेच शिवसेना आणि भाजपाची युती तुटली. आता खडसेंनी आमच्याकडे यावे. हवे तर मी मध्यस्थी करेन. त्यांच्यासारख्या नेत्याची शिवसेनेलाही मदत होईल”, असे अब्दुल सत्तार म्हणाले. तसेच एकनाथ खडसे कधीही संपणार नाहीत. राजकारणात एखादा अपघात होतो आणि त्या अपघाताने एखादा माणूस मागे पडतो. मात्र खडसे यांच्यावर भाजपामध्ये अन्याय झाला आहे. त्यांचे भवितव्य चांगले आहे. त्यांनी शिवसेनेत यावे. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांच्याबाबत निश्चित बोलू”, असे देखील  सत्तार यांनी सांगितले.

ओबीसी समाजाला घेऊन शिवसेनेत या

एकनाथ खडसेंनी ओबीसी समाजाला घेऊन शिवसेनेत सामील व्हावे. त्याचा परिणाम निश्चितच चांगला होईल. एकनाथ खडसे आमचे नेते आहेत. त्याचबरोबर शिवसेनेला त्यांचा फायदाच होईल”, असे देखील अब्दुल सत्तार म्हणाले.

खडसेंची फडणवीसांवर टीका

एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उघडपणे टीका केली असून, खडसेंनी फडणवीसांवर अनेक आरोप केले आहेत. माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्या हॅकर मनिष भंगाळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कशासाठी भेटले? रोहिणी खडसेंच्या परभावाची सलही त्यांनी बोलून दाखवली. मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार असे म्हणत विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेत्यांच्या तिकिटांची काटछाट केल्यामुळेच भाजपाचे सरकार येवू शकले नाही, असा आरोप खडसेंनी केला. आपल्यावर झालेल्या या अन्यायाबाबत ‘नानासाहेब फडणवीसांचे बारभाई कारस्थान’ नावाचे पुस्तक लिहिणार असल्याचेही खडसे यांनी सांगितले. मुक्ताईनगर येथील आपल्या निवासस्थानी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

म्हणून अजित पवारांवर टीका नाही

देवेंद्र फडणवीस हे अजित पवार यांच्यावर टीका का करत नाहीत? असा प्रश्न त्यांना विचारला असता या प्रश्नाचे खडसे यांनी मिश्कीलपणे उत्तर दिले. देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यावर टीकाच करु शकत नाहीत. ते टीका कसे करतील. आपली सर्व तत्वे विसरुन अजित पवार यांच्यासोबत दोन-तीन दिवस संसार केला आहे. मुहर्तसाधून लग्न केले. शपथ घेतली. मुख्यमंत्री झाले उप मुख्यमंत्री झाले. आता तीन चार दिवस दुसऱ्याच्या घरात राहिल्यावर आम्ही कशी टीका करणार, असे खडसे म्हणाले. माझ्यावर आरोपांचे हे षडयंत्र होते. हे षडयंत्र कुणी केले? कसे केले? त्यात कोण होते? कोणत्या मंत्र्याचे पीए होते? कोण अंजली दमानिया यांना भेटत होते, याच्या व्हिडिओ क्लिप देखील माझ्याकडे आहेत. मी हे पुरावे वरिष्ठांना देखील दाखवणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

खडसेंच्या आरोपांवर रावसाहेब दानवेंकडून सारवासारव

एकनाथ खडसे यांच्या आरोपांवर रावसाहेब दानवे यांनी सारवासारव केली आहे. “एकनाथ खडसे यांची नाराजी असेल ती चर्चाकरुन दूर करु. पक्षामध्ये वेळोवेळी बदल केले जातात. गरजेनुसार निर्णय घेतले जातात. आम्ही एकनाथ खडसे यांच्याशी चर्चा करु”, अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.