Dr. Dabholkar Murder प्रकरणात सनातन संस्था निष्कलंकित

त्याला कितीही झाकण्याचा प्रयत्न केला तरी सत्य कधीही अस्तास जात नाही. हा त्रिकाला बाधित सिद्धांत आहे. तो दाभोळकर हत्या प्रकरणातील निवाड्याने अधिक उजागर झाला आहे.

148
  • दुर्गेश परुळकर

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या (Dr. Dabholkar Murder) झाली. आपल्याकडे न्यायव्यवस्था अस्तित्वात असून या न्यायव्यवस्थेकडे न्याय मागण्यासाठी देशातल्या प्रत्येक नागरिकाला मुभा आहे. त्यामुळे कितीही मतभेद निर्माण झाले तरी त्यासाठी कोणाचीही हत्या करणे हे सुसंस्कृत आणि सुविद्य समाजाचे लक्षण नाही. त्यामुळे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या हे अयोग्य आहे, याविषयी दुमत असण्याचे कारण नाही. तथापि कोणताही सबळ पुरावा नसताना एखाद्या संस्थेवर हत्येचे खापर फोडणे हे सुद्धा सभ्यतेचे लक्षण आहे असे म्हणता येत नाही. पण दाभोळकरांची हत्या सनातन संस्थेने केली असे कोणताही आधार नसतांना प्रारंभापासून सांगण्यात आले आणि दुर्दैवाने तपासाची दिशाही तीच राहिली. डॉ. दाभोळकरांची हत्या ही घटना म्हणजे भगवा आतंकवाद आहे असे जनमानसावर ठसवण्यात आले. सनातन संस्थेला लक्ष्य केल्यावर सनातन संस्थेच्या साधकांवर संशय घेतला गेला. त्याप्रमाणे तपास कार्याला आरंभ झाला. डॉ. वीरेंद्र तावडे, अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्यावर दाभोळकरांची हत्या (Dr. Dabholkar Murder) केल्याचा आरोप करण्यात आला. त्यांना अटक झाली आणि कारावासात टाकण्यात आले. वास्तविक ते निरपराध होते. तरीही त्यांना अनेक वर्षे कारावास सहन करावा लागला. हा एक प्रकारचा अन्याय होता.

…तर देशात दंगली उसळल्या असत्या

सनातन संस्थेने मात्र अत्यंत संयमाने या प्रसंगाला तोंड दिले. आपल्या साधकांवर झालेला अन्याय पाहून अविचारीपणाने सनातन संस्था वागल्याचे आढळून येत नाही. सनातन संस्था ही खरोखर आतंकवादी संघटना असती किंवा हा खराच भगवा आतंकवाद असता तर देशात दंगली उसळल्या असत्या. जाळपोळ झाली असती. पण गेल्या दहा वर्षात सनातन संस्थेच्या वतीने अशा प्रकारचे कोणतेही पाऊल उचलले गेले नाही. सनातन संस्थेकडून कोणत्याही प्रकारची सामाजिक किंवा राष्ट्रीय संपत्तीची हानी झालेली नाही. ही गोष्ट आपल्याला दुर्लक्षित करता येत नाही. सनातन संस्थेने हा संपूर्ण लढा अत्यंत संयमाने आणि न्यायव्यवस्थेच्या मर्यादेत राहून दिला असेच दिसून येते. न्याय प्रस्थापित करण्यासाठी अवैध मार्ग अनुसरावा असे सनातन संस्थेला वाटले नाही. सनातन संस्थेने  निर्बंधात्मक लढा चिकाटीने चालू ठेवला. या लढ्यात सनातन संस्थेचा विजय झाला. मुळातच सनदशीर मार्गाने आपले कार्य करणारी सनातन संस्था सात्विक वृत्तीची आहे. याचा अनुभव जनता नित्य घेत आहे. शिस्तबद्ध आणि ज्ञानवृद्धी करण्याचा प्रयत्न करणारी सनातन संस्था संस्कृतीचे आणि धर्माचे विद्यापीठ आहे असे म्हटल्यास वावगे ठरत नाही.‌ कोणतेही विद्यापीठ हिंसक वृत्ती जोपासत नाही. सनातन संस्था हे एक असेच सांस्कृतिक विद्यापीठ आहे. (Dr. Dabholkar Murder)

(हेही वाचा Manusmriti वेळीच शिकवली असती तर राष्ट्रवादी काँग्रेसवर फुटीची वेळ आली नसती; रमेश शिंदेंचा हल्लाबोल)

…आरोप निराधार ठरतो

सनातन संस्थेच्या साधकांवर देशद्रोही कारवायांच्या अंतर्गत जे कलम लावले जाते असे बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायद्याचे कलम लावण्यात आले. याचा अर्थ द्वेष भावनेने सनातन संस्थेच्या विरोधात आरोप करण्यात आले असे म्हटल्यास वावगे ठरत नाही; कारण न्यायालयाने सनातन संस्थेवर लावलेल्या या कलमाला हटवले आहे. यातून सनातन संस्था देशद्रोही म्हणजेच आतंकवादी संघटना आहे असा केला जाणारा आरोप निराधार ठरतो. सोने प्रत्येक वेळी कसाला लावले जाते. त्यासाठी सोन्याला अग्नी परीक्षा द्यावी लागते. त्याचप्रमाणे सनातन संस्थेच्या बाबतीत हे घडले आहे. या संस्थेने अग्नी परीक्षा देऊन ती सोन्यासारखी पवित्र आणि तेजस्वी आहे हे आता सिद्ध झाले आहे.‌ सनातन संस्था हिंदुत्वाच्या विचारधारेचा पुरस्कार करते म्हणजे फार मोठा अपराध करत आहे; असा समज करून घेण्याची आवश्यकता नाही. आजपर्यंत हिंदुत्वाच्या विचारधारेने मानवी समाजाला मान खाली घालावी लागेल असे कोणतेही कृत्य केलेले नाही. जगातल्या अन्य विचारधारांकडे लक्ष दिले तर त्या विचारधारा मानवी समाजाला किती घातक आहेत हे लक्षात येते. सद्विचारांचा संस्कार करण्याऐवजी विकृत मानसिकता वाढवण्याकडे ज्या विचारधारांचा कल आहे अशा विचारधारा आज उजळ माथ्याने जगात वावरत आहे. असत्य कथन करणारी विचारधारा कोणाचेही भले करू शकत नाही. सत्याला कितीही झाकण्याचा प्रयत्न केला तरी सत्य कधीही अस्तास जात नाही. हा त्रिकाला बाधित सिद्धांत आहे. तो कालच्या निवाड्याने अधिक उजागर झाला आहे.  या सिद्धांताला धाब्यावर बसवून विकृत मनोवृत्ती निर्माण करणाऱ्या विचारधारेकडे दुर्लक्ष करून हिंदुत्वाच्या विचारधारेला लक्ष्य  करणे म्हणजे मानवतेशी वैर करण्यासारखे आहे. कारण विकृत विचारधारा नैतिकता, न्याय यांचा गळा घोटणारी असते. सर्वसामान्य जनतेने याचा अवश्य विचार करावा. अशीच ही घटना आहे. म्हणूनच सनातन संस्था निष्कलंक असल्याचे शिक्कामोर्तब झाल्याचा आनंद कोणाही सज्जन माणसाला होईल यात वाद नाही.‌ (Dr. Dabholkar Murder)

(लेखक ज्येष्ठ व्याख्याते आणि वीर सावरकर साहित्य अभ्यासक आहेत.) 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.