सत्यजित तांबेंना भाजप पाठिंबा देणार का?, याचे उत्तर देताना फडणवीस म्हणाले..

99

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात रंजक घडामोडी घडताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एक वेगळाच ट्विस्ट पाहायला मिळाला. नाशिकमधून काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आणि तेव्हापासून राजकीय वर्तुळात एक वेगळीच चर्चा रंगली आहे. सत्यजित तांबेंना भाजपचा पाठिंबा असून ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे. पण या चर्चेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘लवकरच योग्य वेळी योग्य गोष्टी समजतील’

पुण्यात माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की,’मी पुन्हा सांगतो, तुम्ही परिस्थितीवर नजर ठेवा. योग्य वेळी योग्य गोष्टी समजतील.’ दरम्यान सत्यजित तांबे यांच्या भूमिकेनंतर काँग्रेस पक्षातून त्यांची हकालपट्टी केली जाण्याची चर्चा सुरू आहे.

माहितीनुसार, सध्या सत्यजित तांबे यांना अडचणीत आणण्यासाठी महाविकास आघाडी प्लॅन करत आहे. नागपूर आणि नाशिकमधल्या जागांची आदलाबदल करण्याची शक्यता आहे. नाशिकमधून काँग्रेसऐवजी शिवसेना, राष्ट्रवादी आणि नागपूरमधून काँग्रेस लढण्याची शक्यता आहे.

नक्की काय घडले होते?

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. सुधीर तांबेंकडे पक्षाचा एबी फॉर्म देखील होता. पण तरीही सुधीर तांबेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही आणि दुसरीकडे त्यांचे सुपुत्र म्हणजेच सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

(हेही वाचा – ‘…नाहीतर जीवे मारू’; नितीन गडकरींना दाऊदच्या नावाने धमकीचा फोन)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.