BJP : …तर जनतेचा भाजपवरील विश्वास उडून जाईल!

185
  • सचिन धानजी

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि मुख्यमंत्र्यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे आणि भाजपच्या नेत्यांमध्ये काही मुद्यांवरुन वादाला तोंड फुटले आहे. अर्थात जो मतदारसंघ शिवसेनेकडे आहे, त्या कल्याणची सुभेदारी मिळवण्यासाठी झालेला हा वाद. भाजपने महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघ आणि २८८ विधानसभा मतदारसंघात आपले संपर्कप्रमुख नेमल्यानंतर शिवसेना विरुध्द भाजप यांच्यातील धुसफुसीला सुरुवात झाली. खरंतर १०५ आमदार निवडून आलेल्या भाजपला त्यांच्या युतीतील मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जवळीक करत सत्तेपासून दूर ठेवलं होतं, ते त्यांचं सत्तेत येण्याचे स्वप्न एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत ४० आमदारांनी केलेल्या उठावामुळे पूर्ण होऊ शकलं, हे सत्य नाकारुन चालणार नाही. शिवसेना फुटली नसती तर भाजपला विरोधी पक्षात राहावं लागलं असतं. भाजपने उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी फोडाफोडीचे राजकारण केलं म्हणून राज्यात सत्तापालट होऊन शिवसेना भाजप युतीचे सरकार आलं, हे जरी खरं असलं तरी एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांनी जी हिंमत दाखवली म्हणून हे साध्य झालं आणि भाजप सत्तेत आला, हेही नाकारता येणार नाही. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री बनले आणि त्यांचे आमदार मंत्री होऊ शकले. त्यामुळे युतीधर्म पाळत भाजपच्या नेत्यांनी वाचाळवीरांची भूमिका पार पाडत युतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करायला नको होता.

ज्यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत १३ खासदार आले, त्या सर्वांना त्यांच्या मतदारसंघात पुन्हा उमेदवारी दिली जाईल, असे जर आश्वासन दिलं गेलं होतं, तर मग सर्व्हेचा हवाला देऊन त्याठिकाणच्या जागेवर भाजपनं दावा करणं हेच मुळी जनतेला पटणारं नाही. देशात नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान व्हावेत आणि त्यासाठी जास्त खासदार निवडून यावे ही भाजपची रणनीती असली तरी युतीतील घटक पक्ष असलेल्या आमदार, खासदारांच्या मतदारसंघातील जागेवर दावा ठोकत ही दावेदारी करणं हे योग्य नाही. जर भाजपला, शिवसेनेचे खासदार आणि आमदार ज्या मतदारसंघात आहेत त्या मतदारसंघात पुन्हा निवडून येणार नाही असे चित्र दिसत असेल तर भाजपने शिवसेनेला त्या मतदारसंघात मोठं व्हायला द्यायला हवं. त्यांना मदत करायला हवी. शेवटी युती धर्म आहे. म्हणजे थेट अशी दावेदारी करून टोकाची भूमिका जर भाजप नेते घेत असतील तर वरिष्ठ नेत्यांनी त्यांचे कान तिथेच टोचले पाहिजे होते. शेवटी हे सरकार भाजपच्या केंद्रातील नेत्यांनी बसवलं आहे. त्यामुळे असे जर वाद होणार असतील तर हे सरकार भाजपच्या स्थानिक नेत्यांना मान्य नाही किंवा ही युती तरी मान्य नाही, असं स्पष्ट होतं.

(हेही वाचा Jawaharalal Nehru: जवाहरलाल नेहरूंमुळे भारताचा फुटबॉल संघ ऑलिम्पिकमध्ये खेळाला होता अनवाणी )

ठाण्यात भाजपचे आमदार संजय केळकर यांनी आपल्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांसमोरच एक विधान केलं. २०१४ च्या निवडणुकीत या जिल्ह्यातील अनेक लोक मोदी ट्रेनमध्येच बसून गेले. ते आपल्या पक्षाचे असतो वा मित्र पक्षाचे असो. मोदींच्या नावाखाली ते निवडून आले आणि ते आता अनेक प्रकारचे दावे करतात. मला आश्चर्य वाटतं, कीव करावी वाटते. भाजपशिवाय या जिल्ह्यातून कुणीही निवडून जावू शकणार नाही, अशाप्रकारची ताकद भाजपमध्ये आहे. खरं तर ठाणे असो कल्याण असो या जिल्ह्यांमध्ये भाजपशिवाय कुणीही निवडून जावू शकत नाही, असं जर भाजपच्या नेत्यांना वाटत असेल तर शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून आणण्यास कोणतीच अडचण नाही. मग भाजपने ही ताकद या दोन्ही मतदारसंघात शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांच्या पाठिमागे उभी करून त्यांना खासदार म्हणून निवडून आणण्यासाठी वापरायला हवी. जर भाजपची एवढी ताकद होती तर मग २०१४च्या निवडणुकीत भाजपला आपले सर्व आमदार आणि नगरसेवक का निवडून आणता आले नाही?

भाजप जेवढी कुरघोडी करेल तेवढा त्याचा फटका युतीच्या उमेदवाराला बसेल आणि पर्यायाने देशाच्या पंतप्रधानपदी जे नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचे आहे, ते स्वप्न साकारण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या खासदारांच्या मतदारसंघात दावेदारी सांगणं किंवा झाकून पाहणं हे भाजपच्याच अंगलट येईल, हे त्यांनी विसरुन जावू नये.
विशेष म्हणजे ज्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी उठाव केला त्यादिवसापासून त्यांच्यासोबत आलेल्या सर्व आमदार,खासदार, माजी नगरसेवक व इतर नेत्यांना सांभाळून घेण्याची जबाबदारी ही भाजपची आहे. ५० आमदार असताना शिंदे मुख्यमंत्री बनतात आणि १०५ आमदार असलेल्या भाजपचे देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री बनतात, पण हे बनवणारे कोण? हे तरी भाजपच्या नेत्यांनी लक्षात ठेवावं. सत्तेसाठी आम्ही हे केलं नाही, असं चित्र निर्माण करण्यासाठी शिंदे यांना मुख्यमंत्री बनवलं असलं तरी या पक्षाला आता अधिक ताकद देण्याची जबाबदारीही तेवढीच भाजपची आहे. परंतु उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्री पदापासून दूर केलं, आपण सत्तेत आलो, आपलं काम झालं असं जर भाजपला वाटत असेल आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा वापर करून त्यांना फेकून द्यायची ही जर त्यांची सुप्त इच्छा असेल तर मग भाजपला पुन्हा निवडणुकीत आपले उमेदवार निवडून आणणं कठिण आहे, ही काळ्या दगडावरील रेष आहे. कारण शिवसेनेबाबत जर भाजपची ही भूमिका राहिल्यास त्यांच्यावरील जनतेचा विश्वास उडून जाईल आणि विश्वासघातकी भाजप अशी प्रतिमा लोकांच्या मनात निर्माण होईल. त्यामुळे जनतेच्या विश्वासाला सार्थ ठरवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला अधिक बळ देऊन स्वत: बरोबरच त्यांचेही उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपच्या नेत्यांना झटायला हवं. पण जर भाजपचे नेते या आणि त्या विभागात दावेदारी करत शिवसेनेच्या नेत्यांबरोबर वाद निर्माण करत बसतील तर भाजपला भविष्यात मोठा धोका पत्करावा लागेल.

(हेही वाचा Land Jihad : भाईंदरमध्ये लँड जिहाद; सरकारी जमिनीवर बांधला दर्गा; ‘हिंदू टास्क फोर्स’ने उघडकीस आणले )

विशेष म्हणजे ज्या सर्व्हे अहवालाच्या आधारावर भाजपचे नेते मग ते रविंद्र चव्हाण असतील किंवा संजय केळकर असतील हे जे काही दावे करत आहेत, त्या सर्व्हेची सत्यता काय? कशाच्या आधारावर हा सर्व्हे अहवाल बनवला आहे हेही समोर येणं गरजेचं आहे. जर त्या सर्व्हेत त्या पक्षाच्या संभाव्य उमेदवारची बाजू कमकुवत दाखवली असेल, तर त्यावर भाजपने काम करून ती बाजू मजबूत करण्याचा प्रयत्न करणे हे महत्त्वाचे आहे. तिथे हा मतदारसंघ आम्हाला हवा, असा अट्टाहास का? विशेष म्हणजे या नेत्यांनी असे दावेदारी केल्यानंतर भाजपचे पक्षप्रमुख चंद्रशेखर बावनकुळे हे त्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देऊन याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल असं सांगण्याची हिंमत करत नाहीत. त्यामुळे चव्हाण आणि केळकर यांचा बोलवता धनी हा भाजपचा वरिष्ठ नेताच असून अशा प्रकारचं विधान किंवा दावेदारी करत माती किती मऊ आहे याची चाचपणी तथा तपासणी करण्याचा हा भाजपचा प्रयत्न असल्याचे दिसून येतं. त्यामुळे भाजपला आपली विश्वासार्हता टिकून ठेवायची असेल तर शिवसेनेचे कच्चे दुवे शोधून तिथे त्यांना मजबूत करण्यासाठी किंबहुना तिथे भाजपची ताकद वाढवून त्या मतदारसंघात युतीचा उमेदवार कशाप्रकारे निवडून येईल यासाठी प्रयत्न करावा लागेल. तिथे त्यांच्या लोकप्रतिनिधीविरोधात जनमत आहे असे चित्र निर्माण करून त्यावर दावेदारी सांगू नये. पण हे चित्र भविष्यात न दिसल्यास आणि शिवसेनेच्या आमदार, खासदारांच्या मतदारसंघांमध्ये जर भाजपने दावेदारी सांगून आपले उमेदवार उभे केले तर भाजपला आपले उमेदवार निवडून आणणेही कठिण जाईल. भाजपकडे पाहण्याचा दृष्टिकोन जनतेचा बदलेल. आणि या उलट जर शिवसेनेला मदत करत त्यांच्या मतदारसंघात विद्यमान लोकप्रतिनिधींना निवडून आणल्यास भाजपचे स्थान भविष्यात वरच्या क्रमांकावर राहिल आणि पुढे भाजपला खाली खेचण्याची ताकदही कोणात नसेल. त्यामुळे काळाची गरज ओळखून भाजपने शिवसेनेसोबतची साथ अधिक भक्कम करून युती अभेद्य आहे, असाच संदेश देण्याची गरज आहे, असंच मी म्हणेन.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.