कॉ. गोविंद पानसरे हत्याकांड : ७ वर्षे झाली तरीही तपास सुरूच! काय आहे गौडबंगाल?

103

१६ फेब्रुवारी २०१५ या दिवशी कामगार चळवळीतील नेते कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर तपास यंत्रणांनी या हत्येचा संबंध डॉ. दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांशी लावला, त्याप्रमाणे मागील ७ वर्षे नुसता तपासच सुरु आहे, खटला सुरूच झाला नाही. त्यामुळे या प्रकरणातील संशयित इतकी वर्षे तुरुंगात खितपत आहेत. अशाच प्रकारे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित ९ वर्षे कारागृहात खितपत होते, अखेर त्यांना जामीन देण्यात आला. आता जेव्हा मालेगाव प्रकरणाचा खटला सुरु झाला आहे, तेव्हा मात्र साक्षीदार त्यांची साक्ष जबरदस्तीने घेतली होती, असे सांगत साक्ष फिरवत आहेत. ज्यामुळे खटला कमकुवत होत आहे. हीच भीती कॉ. पानसरे यांचा खटला सुरु न करण्यामागे तपास यंत्रणांना वाटत आहे का?, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

खटला सुरू होऊ नये म्हणून तपास यंत्रणाच आग्रही

२००९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी मालेगाव बॉम्बस्फोटाच्या तपासाचा वापर करण्यात आला. त्यामध्ये तपासाची दिशा बदलून त्यात हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. अभिनव भारत या संघटनेचे हे कार्यकर्ते होते. मात्र तब्बल ९ वर्षे यातील संशयित कारागृहात खितपत होते, अखेर १३ वर्षांनी मालेगाव बॉम्बस्फोटाचा खटला सुरू झाला. असाच खटला कॉ. पानसरे हत्याकांडातील संशयित वारंवार करत आहेत, मात्र हा खटला सुरु करू नये, यासाठी स्वतः कॉ. पानसरे यांचे कुटुंबीय आणि विशेष तपास यंत्रणा प्रयत्न करत आहेत. २०१३ साली विशेष तपास पथक हा खटला चालवू नका, या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात गेले आहेत.

(हेही वाचा डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणातील आरोपी विक्रम भावेंना जामीन मंजूर!)

बंदुकीच्या रिकाम्या पुंगळ्या गेल्या कुठे?

खटला चालवू नये या भूमिकेसाठी विशेष तपास पथकाने आम्ही सगळा मुद्देमाल हा सीबीआयला दिला आहे, असे म्हटले आहे. त्यांनी बंदुकीच्या रिकाम्या पुंगळ्या स्कॉटलँड यार्डला पाठवल्या आहेत, त्याचा रिपोर्ट येईपर्यंत खटला चालवू नये, असे तपास यंत्रणा म्हणाल्या आहेत. प्रत्यक्षात मात्र त्या पुंगळ्या स्कॉटलँड यार्डला पाठवण्यात आल्या नाहीत, असे न्यायालयात उघड झाले आहे.

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याला ७ वर्षे झाली. महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ विचारवंत, राजकीय नेत्याचा खून या शाहू महाराजांच्या पुरोगामी भूमीवर झाला, याचे दु:ख आहे. पण लोकशाही व्यवस्थेत न्यायालयीन मार्गाने खुनी व खुनाचे सूत्रधार यांना शिक्षा होण्यासाठी दीर्घकालीन लढा लढावा लागतो. तो आम्ही लढत आहोत. विचारांचा सामना विचाराने व्हावा, हिंसेने नव्हे, यासाठी समाजात एक जागर घडवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. डॉ. दाभोलकर यांच्या खुनाचा खटला सुरू झाला. पण अद्याप कॉ. पानसरे खुनाचा खटला सुरू झाला नाही. तो लवकरात लवकर सुरू झाला पाहिजे. परंतु अद्याप खुनाच्या नियोजनात सहभागी सर्व लोक पकडले गेले नाहीत. म्हणूनच हा एका मोठ्या कटकारस्थानाचा भाग आहे आणि तपास सुरूच राहील, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
– मेघा पानसरे, (कॉम्रेड गोविंद पानसरे यांची सून)

संशयितांना निर्दोष मुक्त करण्याची मागणी

या प्रकरणात १२ संशयितांना अटक करण्यात आले आहे. तपास संपत नाही आणि खटलाही सुरु होत नाही, म्हणून तपास यंत्रणांना सबळ पुरावे हाती न लागल्याचा मुद्दा उपस्थित करत संशयितांच्या वकिलांनी संशयितांना दोषमुक्त करण्याचा अर्ज कोल्हापूरच्या सत्र न्यायालयात केला आहे. समीर गायकवाड, डॉ.विरेंद्र तावडे आणि सचिन अंदुरे यांचा यामध्ये समावेश आहे. यावर 18 फेब्रुवारीला होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तर दुसरीकडे पानसरे यांचे कुटुंबीय आणि अनुयायी मात्र पोलिसांच्या तपासाबाबत नाराजी व्यक्त केली असून आरोपी दोषी असल्यानेच पळ काढत असल्याचा आरोप त्यांच्याकडून होत आहे.

(हेही वाचा बुरखा, हिजाब ब्रेन वॉशिंगचा परिणाम!)

समीर गायकवाड आणि डॉ. तावडे यांना जामीन

या प्रकरणात संशयित समीर गायकवाड यांना २०१७ साली आणि डॉ. वीरेंद्र तावडे यांना २०१८ साली जामीन मंजूर झाला आहे, आता त्यांना दोष मुक्त करण्याची मागणी होत आहे. २०१३ साली कॉ. पानसरे यांच्यावर सारंग अकोलकर आणि विनय पवार यांनी गोळ्या झाडल्या, असा आरोप करण्यात आला होता, त्यानंतर तपास यंत्रणांनी समीर गायकवाड आणि डॉ. तावडे या दोघांनी गोळ्या झाडल्या, असा आरोप केला. एकाच व्यक्तीला ४ वेगवेगळ्या व्यक्ती गोळ्या कशा झाडू शकतात, असा प्रश्न उपस्थित केला. त्या मुद्यावरच गायकवाड आणि तावडे यांना जामीन देण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

कामगारांच्या न्याय हक्कासाठी कायम धडपडणारे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर 16 फेब्रुवारी 2015 रोजी कोल्हापुरातील सागरमळा परिसरात त्यांच्या राहत्या घराजवळ हल्ला झाला होता. गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे मॉर्निग वॉक करून घरी परतत होते, तेंव्हा दोन अज्ञात व्यक्तींनी दुचाकीवर येऊन त्यांच्यावर 3 गोळ्या झाडल्या होत्या. यामध्ये दोन गोळ्या पानसरे यांना लागल्या होत्या, तर एक गोळी उमा पानसरे यांना चाटून गेली होती. उमा पानसरे यांच्यावर काही दिवस उपचार केल्यावर त्यांना घरी सोडून देण्यात आले, मात्र पानसरे यांच्यावर कोल्हापूरमध्ये उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 20 फेब्रुवारी रोजी उपचारादम्यान पानसरे यांचा मृत्यू झाला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.