CM Eknath Shinde : अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांची तुफान फटकेबाजी; आमचे सरकार परफॉर्मन्स देणारे, फेसबुक लाईव्ह करणारे नव्हे

84

उद्योग बाहेर गेल्याचा विषय आला. राज्यात १ लाख १८ हजार कोटींची गुंतवणूक गेल्या वर्षभरात झाली. हे सरकार सत्तेवर येण्याआधी गुजरात आणि कर्नाटक राज्ये आपल्या पुढे होती. पण नव्या गुंतवणुकीमुळे आपण पुन्हा पहिल्या स्थानावर आलो. या अधिवेशनात उद्योग विभागाची श्वेतपत्रिका काढण्याचे धाडस आमच्या उद्योगमंत्र्यांनी केले आहे. आम्ही सत्तेवर येताच बंद पडलेले सगळे प्रकल्प पुन्हा सुरू केले. हे सरकार परफॉर्मन्स करणारे, २४/७ काम करणारे सरकार आहे. फेसबुक लाईव्ह करणारे आमचे सरकार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना दिले.

जयंत पाटील यांच्या बोलण्यातील धार निघून गेली. शेवटी संख्येचा परिणाम आवाजावर होतो. त्यामुळे विरोधक गोंधळलेले दिसून आले. आत्मविश्वास थोडासा डगमगलेला दिसतोय. पावसाळी अधिवेशनात विधानसभा सभागृह एकदाही तहकूब झाले नाही. सर्व सदस्यांना बोलण्याची संधी मिळाली.

सरकार पडणार असल्याच्या भविष्यवाण्या फोल

गेले वर्षभर सरकार पडणार, मुख्यमंत्री बदलणार अशा भविष्यवाण्या केल्या. पृथ्वीराज चव्हाणसुद्धा माझ्या मागे लागले. परंतु, सरकार अधिक मजबूत होत गेले. १७० आमदारांचे पाठबळ आधी होते. केंद्र आणि राज्य सरकारचा कारभार पाहून अजित पवार आणि राष्ट्रवादीचे आमदार आमच्यासोबत आले. त्यामुळे संख्याबळ २१५ वर गेले आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यभरात आतापर्यंत (तीन महिन्यांत) १ कोटी १३ लाख जणांना लाभ मिळाला आहे. त्यांच्यावेळी ‘शासन आपल्या घरी’ होते. शिक्षणाचा दर्जा घसरल्याचा आरोप करण्यात आला. पण, हा आरोप करताना त्यांनी ज्या अहवालाचा आधार दिला, तो २०२१-२२ चा होता. त्यावेळी कोण मुख्यमंत्री होता? त्यांच्या काळात शिक्षण, उद्योग यांसह टोमण्यांचाही दर्जा घसरला होता, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. यावर्षी ३७ टक्के वीज दरवाढ झाल्याचा मुद्दा विरोधकांनी मांडला. पण, त्यांच्याकडची माहिती पूर्णतः चुकीची आहे. यंदा २.९ टक्के, तर पुढच्या वर्षी ५.६ टक्के वीज दरवाढ होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. कालच्या कॅबिनेटमध्ये अतिरिक्त निधी मंजूर करून वीजदर पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही ‘ईडी’मध्ये सूट दिली. ईडी अर्थात इलेक्ट्रिसिटी ड्युटी, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. तितक्यात राजेश टोपे बाकावरून उठले. त्यावर अजित पवार म्हणाले, अरे राजेश ते ईडी म्हणाले म्हणून तू का उठलास? त्यावर सभागृहात एकच हशा पिकला.

(हेही वाचा Ashish Shelar : रशेष शाह यांचा बोलविता ‘धनी’ कोण? – ॲड. आश‍िष शेलार)

कोविड घोटाळ्याची चौकशी

कोविड काळातील घोटाळ्यांची चौकशी करणार आहोत. मृतदेह ठेवण्याची जी बॅग ५५० रुपयाला मिळते, ती बॅग ६ हजारात घेतली. रेमडेसीवीरमध्ये घोटाळा केला. मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा अत्यंत निंदनीय प्रकार त्यांनी केला. मी मुख्यमंत्री झाल्यापासून १०० कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीअंतर्गत गोरगरिबांना दिले. यांच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात फक्त २ कोटी रुपये वाटले गेले होते.

आमच्या ५० आमदारांना खोके, गद्दार म्हणून हिणवता

ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी, मतदारांशी, परिवाराशी, २५ वर्षे जुन्या मित्राशी गद्दारी केली तो महागद्दार कोण, हे समोर आणायची वेळ आली आहे. संयम बाळगतो याचा अर्थ कधीच तोंड उघडणार नाही, असा घेऊ नका. जेव्हा वेळ येईल, तेव्हा मोकळेपणाने बोलेन. औरंगजेब महाराष्ट्राचा शत्रू होता. त्याने मंदिरे उध्वस्त केली. हिंदूंना त्रास दिला. त्यामुळे औरंगजेब कुणाचा हिरो होऊ शकत नाही. अबू आझमी, रईस शेख औरंगजेबाचे स्टेटस झळकवणाऱ्यांना सहानुभूती दाखवत आहे. पण महाराष्ट्रात असे प्रकार सहन केले जाणार नाहीत. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या औलादी ठेचल्या जातील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.