बाळासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारकाची मुख्यमंत्री शिंदे घेतात अधिक काळजी…

95

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे काम युध्दपातळीवर असून या स्मारकामध्ये तोतयागिरी करून मुख्यमंत्री बनलेल्यांना स्थान देणार नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जाहीर केले. राज्यातील विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून शिवसेना पक्षप्रमुखांनी ही घोषणा केली असली, तरी या स्मारकारचे काम योग्यप्रकारे व्हावेत याची काळजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हेच घेत असल्याची बाब समोर आली आहे. स्मारकात सुरु असलेल्या कामाच्या ठिकाणी दुघर्टनेसारखी कोणत्याही प्रकारची घटना घडल्यास तात्काळ रुग्णालयात दाखल करता यावे यासाठी याठिकाणी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली आहे. या रुग्णवाहिकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची छायाचित्रे आहेत. त्यामुळे रुग्णवाहिकेच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचे स्मारकाच्या कामांची जास्त काळजी घेत असल्याचे दिसून येत आहे.

स्मारकाचे आतापर्यंत ५८ टक्के बांधकाम पूर्ण

दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील जुन्या महापौर निवासस्थानाच्या जागेवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारणीचे काम सुरु आहे. महापालिकेच्या माध्यमातून महापौर निवासस्थानाची जागा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या नावावर हस्तांतरीत करण्यात आल्यानंतर एमएमआरडीएच्या माध्यमातून या स्मारकाच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. या स्मारकाचे आतापर्यंत ५८ टक्के बांधकाम पूर्ण झाले. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून या प्रकल्पाची अंमलबजावणी  केली जात असून यासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर आतापर्यंत १८१ कोटी रुपयांचा खर्च यावर करण्यात आला असल्याची माहिती शिवसेना नेते आणि माजी मंत्री सुभाष देसाई यांनी दिली होती.

(हेही वाचा अखेर ‘इंटरनॅशनल हलाल शो’ रद्द, हिंदुत्वनिष्ठांच्या आंदोलनाचा परिणाम)

एकनाथ शिंदेंनी दिलेली रुग्णवाहिका दिमाखात उभी

या स्मारकाचे बांधकाम सुरु असल्याने मुख्य प्रवेशद्वारापाशी एक रुग्णवाहिका उभी आहे. स्मारकाच्या बांधकामामध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाचा वापर होत असल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आली आहे. या तैनात रुग्णवाहिकेच्या एका बाजुला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची छायाचित्र आहेत, तर दुसऱ्या बाजुला बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची छायाचित्रे आहेत. एकनाथ शिंदे हे शिवसेनेत असतानाही त्यांनी ही रुग्णवाहिका याठिकाणी तैनात केली होती, परंतु शिंदे पक्षातून फुटून जात बाळासाहेबांची शिवसेना पक्ष स्थापन करत राज्यात भाजपसोबत युतीचे सरकार स्थापन केले. परंतु शिंदे यांच्या नावाच्या पाट्यांसह त्यांचे फलक हटवले गेले तरी स्मारकाच्या बाहेर त्यांनी दिलेली रुग्णवाहिका त्यांच्या छायाचित्रांसह झळकत दिमाखात उभी आहे. काही दिवसांपासून उध्दव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारकात तोतया मुख्यमंत्र्यांना स्थान नसेल, असे जाहीर केले असले तरी रुग्णवाहिकेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे हे स्मारकारच्या कामातील कामगारांची काळजी घेत असल्याचे दिसून येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.