धर्मांतर केलेल्या सीपीआयच्या आमदाराची आमदारकी रद्द; केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय 

3

केरळ उच्च न्यायालयाने ख्रिश्चन धर्म स्वीकारलेले डावे आमदार ए राजा यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. ते CPI(M) च्या तिकिटावर अनुसूचित जाती (SC) साठी राखीव असलेल्या जागेवरून निवडून आले होते. हायकोर्टाने त्यांची आमदारकी कायदा रद्द करत म्हटले की, कोणीही ख्रिस्ती झाल्यानंतर हिंदू असल्याचा दावा करू शकत नाही.

काँग्रेस नेते डी कुमार यांनी याचिका दाखल करून त्यांच्या निवडणुकीला आव्हान दिले. ख्रिश्चन झाल्यानंतर ए राजा यांनी बनावट जात प्रमाणपत्र वापरून निवडणूक लढवल्याचा आरोप करण्यात आला होता. सोमवारी, २० मार्च २०२३ रोजी या याचिकेवर सुनावणी करताना केरळ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी सोमराजन यांनी केरळची देवीकुलम जागा अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याचे सांगितले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी ए राजा ख्रिश्चन झाले होते. त्यामुळे त्यांना अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जागेवरून निवडणूक लढवता आली नाही. न्यायालयाने आपल्या निकालात असेही म्हटले आहे की, ख्रिश्चन झाल्यानंतर ए राजा हिंदू धर्माचा असल्याचा दावा करू शकत नाही. त्याआधारे निवडणूक अधिकाऱ्यांनीही त्यांचा अर्ज फेटाळायला हवा होता. लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ च्या कलम ९८ अन्वये न्यायालयाने ए राजा यांची निवडणूक अवैध ठरवली.

(हेही वाचा पंतप्रधान मोदींविरोधात पोस्टरबाजी केल्याप्रकरणी ६ जण ताब्यात, तर १००हून अधिक जणांवर FIR दाखल)

काय प्रकरण आहे?

केरळमध्ये 2021 मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकीत सीपीआय(एम) ने ए राजा आणि काँग्रेसने डी कुमार यांना देवीकुलम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. अर्ज भरताना डी कुमार यांनी रिटर्निंग ऑफिसरसमोर हा मुद्दा उपस्थित केला की, ए राजा हे ख्रिश्चन आहेत, त्यामुळे ते अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जागेवरून निवडणूक लढवू शकत नाहीत. मात्र त्यानंतर त्यांची याचिका रिटर्निंग ऑफिसरने फेटाळून लावली होती. यानंतर डी कुमार यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. तेथेही त्यांनी ए राजा यांच्या जात प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राजा यांच्या लग्नाचा फोटो, CSI चर्चच्या कौटुंबिक रजिस्टरमधील नोंदी, चर्चच्या बाप्तिस्म्यासंबंधी रजिस्टरमधील नोंदी कोर्टात सादर करण्यात आल्या. डी कुमार यांनी सांगितले की ए राजाची पत्नी देखील ख्रिश्चन आहे. त्यांचे लग्न चर्चमध्ये झाले होते. सर्व पुरावे आणि युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने ए.राजा यांची निवडणूक रद्द केली. 2021 च्या केरळ विधानसभा निवडणुकीत, देवीकुलम जागेवरील सीपीआय(एम) उमेदवार ए राजा यांनी काँग्रेस उमेदवार डी कुमार यांचा 7847 मतांनी पराभव केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.