Kishori Pednekar : कोविड काळातील बॉडी बॅग्ज घोटाळा; किशोरी पेडणेकरांची ईडीकडून सहा तास चौकशी 

72

कोविड काळामध्ये मुंबई महानगरपालिकेने खरेदी केलेल्या बॉडी बॅग्जमध्ये झालेल्या कथित घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ने मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांची गुरुवारी, २३ नोव्हेंबर रोजी तब्बल सहा तास चौकशी केली. दुपारी सव्वा बाराच्या दरम्यान किशोरी पेडणेकर ईडीच्या कार्यालयात दाखल झाल्या. सायंकाळी सहा वाजता त्या तेथून बाहेर पडल्या.

किशोरी पेडणेकर यांनी आरोप नाकारले 

या प्रकरणी ८ नोव्हेंबर रोजी त्यांना सर्वप्रथम समन्स जारी करण्यात आले होते. मात्र, त्यांनी वकिलामार्फत मुदतवाढ मागितली होती. त्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी त्यांना ११ नोव्हेंबर रोजी पुन्हा समन्स जारी करण्यात आले होते. त्यानुसार गुरुवारी त्या चौकशीसाठी उपस्थित राहिल्या. या प्रकरणी आपण कोणतेही आदेश दिले नसल्याचे सांगत आपल्यावरील आरोपांचा किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी ईडी चौकशीमध्ये इन्कार केल्याची माहिती सुत्रांनी दिली. कोविड काळामध्ये खरेदी झालेल्या बॉडी बॅग्ज या एका खाजगी कंपनीकडून मुंबई महानगरपालिकेने तिप्पट दराने खरेदी केल्याचा आरोप करत या प्रकरणी ४ ऑगस्ट रोजी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवला होता.

(हेही वाचा Urban Naxal : राजकीय पक्षांमध्‍ये शहरी नक्षलवाद्यांची घुसखोरी अराजकतेची चाहूल)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.