“तुमच्या स्क्रिप्टरायटरला क्रिएटिव्हिटी वाढवायला सांगा, कारण…”, फडणवीसांचा ठाकरेंच्या भाषणावर खोचक टोला!

113

दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर इतिहासात पहिल्यांदाच काल, बुधवारी शिवसेनेचे दोन दसरा मेळावे झाले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शिवतीर्थावर तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बीकेसी मैदानावर दसरा मेळावा पार पडला. यावेळी शिंदे आणि ठाकरे यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केल्याचे पाहायला मिळाले. दोन्ही बाजूच्या नेते मंडळींनी केलेल्या भाषणांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर खोचक शब्दांत टीका केली आहे. इतकेच नाही तर खरी शिवसेना कोणती हे देखील शिंदेंनी दाखवून दिल्याचे त्यांनी सांगितले.

(हेही वाचा – मुलांना ‘हे’ कफ सिरप देताय? भारतीय बनावटीच्या सिरपमुळे तब्बल 66 बालकांचा मृत्यू)

दरम्यान, एकनाथ शिंदे भाजपाची स्क्रिप्ट घेऊन बोलतात, असा आरोप करणाऱ्या उद्धव ठाकरेंना फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे. असे जे म्हणत आहेत, त्यांनी आपल्या स्क्रिप्टरायटर बदलायला हवा, तेच ते तेच किती वेळी तीच स्क्रिप्ट. एकतर तुमच्या स्क्रिप्टरायटरला क्रिएटिव्हिटी वाढवायला सांगा, नाहीतर नवीन स्क्रिप्टरायटर आणा. कारण आम्हालाही हे ऐकून कंटाळा आला आहे, असेही म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना सल्ला दिला आहे.

खरी शिवसेना कोणाची हे शिंदेच्या दसरा मेळाव्यातील गर्दीने दाखवून दिली. तर उद्धव ठाकरेंच्या भाषणात शिमगा सोडून काहीच नसते आणि शिमग्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत नाही, असा टोलाही फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, नागपुरात असल्याने मी दोन्ही भाषणं ऐकलेली नाहीत. पण मी भाषणांचा थोडा सारांश ऐकला आहे. मी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर प्रतिक्रिया देणार नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. तर विधानसभेवर भगवा फडकणारच. पण तो शिंदेंच्या नेतृत्वाखालची खरी शिवसेना आणि भाजपा या युतीचा भगवा फडकणार, असा इशारा यावेळी फडणवीसांनी दिला.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.