गटविम्याबाबत भाजप नगरसेवकाची स्थायी समिती अध्यक्षांकडे ‘ही’ मागणी

नवीन योजनेचे परिपत्रक निघेपर्यंत ज्या ज्या कर्मचाऱ्यांचा वैद्यकीय आरोग्य विमा पॉलिसी आहेत, त्या सर्वांना पूर्वलक्षी प्रभावाने प्रिमियमची रक्कम दिली जावी, अशी मागणी हरिष भांदिर्गे यांनी केली आहे.

112

मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी  लागू करण्यात आलेली वैद्यकीय गटविमा बंद होवून पाच वर्षे होत आली आहे. परंतु तीन वर्षांकरता ही योजना रावबली जात असतानाच दोन वर्षातच बंद पडली. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून एकप्रकार कर्मचाऱ्यांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे आता गटविमा योजना बंद करून जर वैयक्तिक आरोग्य विमा पॉलिसी लागू करून  १२ हजारांपर्यंतच्या देय रकमेची प्रतिपूर्ती महापालिकेच्यावतीने केली जाणार असेल, तर ती ऑगस्ट २०१७पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावी अशी मागणी भाजपने केली आहे.

प्रशासनाने केवळ ११७ कोटी रुपये देण्याचीच तयारी दर्शवली!

महापालिका स्थायी समिती सदस्य व कुर्ला येथील भाजपचे नगरसेवक हरिष भांदिर्गे यांनी महापालिका स्थायी समिती अध्यक्षांकडे निवेदनाद्वारे केली आहे. महापालिकेच्या स्थायी समितीच्या पटलावर गटविमा योजनेऐवजी वैयक्तिक आरोग्य विमा पॉलिसी अंतर्गत ज्या त्यांच्या पॉलिसीची रक्कम आता महापालिकेच्या तिजोरीतून अदा केली जाणार आहे. आरोग्य विमा पॉलिसीच्या प्रिमियमची रक्कम किंवा १२ हजार पैकी जी रक्कम कमी असेल त्या रकमेची प्रतिपूर्ती करण्यात येणार असल्याचा हा प्रस्ताव आहे. या निवेदनामध्ये भांदिर्गे यांनी मुंबई महापालिकेतील कार्यरत कर्मचारी व १ एप्रिल २०११ पासून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी १ ऑगस्ट २०१५ पासून वैद्यकीय गटविमा योजना सुरु करण्यात आली होती. सन २०१५-१६ व सन २०१६-१७ या कालावधीत वैद्यकीय गटविमा योजना कार्यान्वित होती. महापालिकेने दि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीची तीन वर्षांसाठी निवड केली होती. यासाठी प्रथम वर्षांसाठी ८४ कोटीसह सेवा कर आणि त्यानंतरच्या पुढील वर्षासाठी ९६.६० कोटी व अधिक कर अशांचे कंत्राट करण्यात आले होते. परंतु ऑगस्ट २०१७ ते जुलै २०१८ या वर्षांसाठी युनायटेड कंपनीने १४५ कोटी रुपयांचा दावा केला होता. परंतु हे पैसे अधिक असल्यामुळे महापालिका प्रशासनाने हे पैसे देण्यास असमर्थता दर्शवली होती. पण प्रशासनाने केवळ ११७ कोटी रुपये देण्याचीच तयारी दर्शवली होती.

(हेही वाचा : खड्ड्यांबाबत आयुक्तांची तारीख पे तारीख)

पूर्वलक्षी प्रभावाने प्रिमियमची रक्कम देण्याची मागणी 

सन २०१७-१८ या कालावधीतील प्रिमियमच्या रकमेबाबत युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीसोबत वाटाघाटी यशस्वी न झाल्याने १ ऑगस्ट २०१७ पासून  वैद्यकीय गटविमा योजना बंद करण्यात आली आहे. परंतु आता ही योजना पुन्हा सुरु करण्यासाठी मागवलेल्या निविदांमध्ये योग्य प्रतिसाद न लाभल्याने ऑगस्ट २०१७पासून गटविमा योजना बंद झाल्यापासून ते योजनेऐवजी वैयक्तिक आरोग्य विमा पॉलिसीच्या प्रिमियमच्या रकमेची प्रतिपूर्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णय योग्य असला तरी मागील पाच वर्ष नुकसान करण्यात आले आहे. त्यामुळे जेव्हापासून ही वैद्यकीय गटविमा योजना बंद झाली आहे तेव्हापासून अर्थात ऑगस्ट २०१७ पासून ते या नवीन योजनेचे परिपत्रक निघेपर्यंत ज्या ज्या कर्मचाऱ्यांचा वैद्यकीय आरोग्य विमा पॉलिसी आहेत, त्या सर्वांना पूर्वलक्षी प्रभावाने प्रिमियमची रक्कम दिली जावी, अशी मागणी हरिष भांदिर्गे यांनी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.