Dhule : धुळ्यात वंचितला फटका; आता दुहेरी लढत होणार

103

धुळे (Dhule) लोकसभा मतदार संघात कालपर्यंत तिहेरी लढत होणार असे चित्र होते. कारण वंचित बहुजन आघाडीने अब्दुल रेहमान यांना उमेदवारी दिली होती. मात्र रहमान यांचा अर्ज बाद ठरल्यामुळे आता या ठिकाणी दुहेरी लढत होणार आहे.

उच्च न्यायालयात आव्हान देणार 

वंचितचे येथील उमेदवार अब्दुल रेहमान यांचा उमेदवारी अर्ज छाननीअंती बाद झाला आहे. वंचित बहुजन आघाडीने धुळे (Dhule) लोकसभेसाठी सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी अब्दुल रेहमान यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरून प्रचारही सुरू केला होता. पण शनिवारी झालेल्या उमेदवारी अर्जाच्या छाननीत अब्दुल रेहमान यांचा अर्ज बाद ठरवण्यात आला. यासाठी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होण्याचा त्यांचा निर्णय न्यायप्रविष्ट असल्याचा दाखला देण्यात आला. दुसरीकडे, अब्दुल रेहमान यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. ते लवकरच या प्रकरणी आपली याचिका दाखल करणार आहेत. धुळे (Dhule) लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे येथून अन्य एखाद्या इच्छुक उमेदवाराला मैदानात उतरवण्याचा वंचितपुढील पर्यायही बंद झाला आहे. परिणामी, आता वंचितला येथे निवडणुकीच्या मैदानात असणाऱ्या एखाद्या उमेदवाराला आपला पाठिंबा द्यावा लागेल. या स्थितीत येथील निवडणुकीचे समीकरण बदलण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा Congress च्या उमेदवाराने निवडणूक लढवण्यास दिला नकार; कारण…)

अडीच लाख मुस्लिम मते 

धुळे (Dhule) लोकसभा मतदार संघात मुस्लिमांची जवळपास अडीच लाख मते आहेत. अब्दुल रहमान यांनी धुळे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. ते पोलीस महानिरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झालेत. राज्य शासन आणि केंद्र शासनाने त्यांचा विविध पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. या मतदार संघातून भाजपाने माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे यांना उमेदवारी दिली आहे तर महाविकास आघाडीच्या काँग्रेसने शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.