बाळासाहेबांनी ८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण हा विचार कार्यकर्त्यांमध्ये रुजवला – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

108

महाराष्ट्र विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्यात आले, गेली दोन दशके मी समाजकारण आणि राजकारण करत आहे. बाळासाहेबांनी ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा विचार माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनात रुजवला. माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला आपले विचार राष्ट्रीय पातळीवर मांडण्याची संधी दिली. म्हणूनच आपण आज इथे या व्यासपीठावर आहे, असे वक्तव्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले.

टीकाकारांना बाळासाहेब समजलेच नाही 

विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण सोमवारी करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. बाळासाहेब होते म्हणूनच हा महाराष्ट्र आज या स्थितीत दिसत आहे. हा महाराष्ट्र अखंड राहिला आहे. बाळासाहेबांच्या विचारातूनच राज्याची प्रगती दिवसेंदिवस होत आहे. बाळासाहेबांची विचारधारा आणि कार्यपद्धती लोकशाहीविरोधी, कट्टरवादी आहे, असे त्यांचे टीकाकार म्हणत असत त्यांना बाळासाहेब कधी समजलेच नाहीत. संपूर्ण अधिकार, ताकद स्वतःच्या हातात असूनही साधे महापौर पद किंवा मुख्यमंत्री पद हे त्यांनी कधी स्वतःसाठी किंवा परिवारासाठी ठेवले नाही. सामान्यांपासून सामान्य शिवसैनिकावर विश्वास ठेवून त्यांना पदे दिली. याच्यापेक्षा लोकशाहीप्रणित वर्तन आणखी दुसरे कसे असू शकते? टीकाकारांनी अनेकदा बाळासाहेब कट्टरवादी आहेत, असे म्हटले आहे. त्यांना सांगू इच्छितो की बाळासाहेबांसारख्या सर्वधर्म समभाव पाहणारा नेता खचितच दुसरा कुणी असेल. जे हिंदुस्थानात राहतात ते हिंदुस्थानच्या बाहेरील लोकांची स्तुती करतात, हे कदापि त्यांना मान्य नव्हते. समाजातील एखाद्या विशिष्ट गटाची मर्जी राखण्यासाठी बहुसंख्य समुदायावर अन्याय करणे, त्यांच्या अधिकारावर गदा आणणे हे कदापि स्वीकार्य नाही. परंतु तरीही त्यांनी कोणत्याही समाज, धर्माविषयी दुजाभाव केला नाही अथवा कोणत्याही समाजाच्या व्यक्तीला अपमानित केले नाही. यातूनच त्याच्यातील सर्वधर्म समभाव असा गुण दिसून येतो. जुलै महिन्यात सरकार स्थापन केल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिले निवेदन विधानसभा अध्यक्षांकडे दिले त्यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधिमंडळात लावण्याची विनंती केली आहे. त्यामुळे आजचा हा दिवस दिसत आहे, असेही राहुल नार्वेकर म्हणाले.

(हेही वाचा सव्वा तीन वर्षांनंतर बाळासाहेबांच्या नावापुढे हिंदुहृदयसम्राट लागले याचा अभिमान वाटतो – राज ठाकरेंचा उद्धवना चिमटा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.