-
विशेष प्रतिनिधी
भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat Case) याच्या अघोरी कृत्यांच्या प्रकरणाने आता महाराष्ट्राच्या राजकारणात ‘गँगवॉर’सदृश परिस्थिती निर्माण केली आहे. खरातच्या कृष्णकृत्यांचे चटके आता थेट दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांना बसू लागले असून, एकमेकांच्या नेत्यांना ‘सहआरोपी’ करण्याची मागणी करत शरद पवार गट आणि अजित पवार गट आमनेसामने ठाकले आहेत. या आरोप-प्रत्यारोपांमुळे सिन्नरच्या या भोंदूचे राजकीय धागेदोरे नक्की कुठे आणि कुणापर्यंत पोहोचले आहेत, यावरून मोठी खळबळ उडाली आहे.
शरद पवार गटाचा प्रहार: “तटकरे आणि चाकणकर सहआरोपी हवेत!”
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी थेट हल्ला चढवत रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी केली आहे. “केवळ राजीनामा देऊन पाप धुतले जात नाही. चाकणकर आणि तटकरे हे सतत या लिंगपिसाट खरातच्या संपर्कात होते. विशेष म्हणजे, आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना मंत्रिपद मिळू नये म्हणून खरातने तटकरेंकडे फिल्डिंग लावली होती का? याचा खुलासा झालाच पाहिजे,” असा खळबळजनक आरोप लवांडे यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी या दोन्ही बड्या नेत्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.
(हेही वाचा – PM Narendra Modi यांच्या हस्ते जेवर विमानतळाचे उद्घाटन; नोएडा आता विकासाचे इंजिन!)
अजित पवार गटाचा पलटवार: “आधी जयंत पाटलांना आत टाका!”
लवांडे यांच्या आरोपांना अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. “दुसऱ्याचे बघायचे वाकून आणि स्वतःचे ठेवायचे झाकून, ही शरद पवार गटाची जुनी प्रवृत्ती आहे,” असा टोला लगावत त्यांनी थेट जयंत पाटलांचे नाव घेतले. “भोंदू खरातच्या ट्रस्टला पाणी मिळाले तेव्हा जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) होते. त्यांचे खरातसोबतचे असंख्य फोटो आणि भेटींचे पुरावे उपलब्ध आहेत. जर कुणाला सहआरोपी करायचे असेल, तर सर्वात आधी जयंत पाटलांना करा,” अशी मागणी परांजपे यांनी केली. तसेच, विकास लवांडे हे रोहित पवारांच्या सांगण्यावरून वळवळ करत असल्याची खोचक टीकाही त्यांनी केली.
सत्ताधारी विरुद्ध विरोधक: चौकशीचा फेरा कुणाकडे?
अशोक खरात विरोधात महायुती सरकार कठोर पावले उचलत असून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर लक्ष ठेवून आहेत. रुपाली चाकणकर यांनी आधीच आपल्या पदांचे राजीनामे दिले असले, तरी विरोधकांनी या प्रकरणाचे भांडवल करत सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दुसरीकडे, जुन्या काळातील ‘कनेक्शन’ काढून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात खेचले आहे.
आता एसआयटीच्या (SIT) तपासात नक्की कोणत्या नेत्याचे नाव अधिकृतरित्या समोर येते आणि खरातला अभय देणारा तो ‘राज्यातील अत्यंत मोठा नेता’ नेमका कोण, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत. दोन्ही गटांतील या ‘कलगीतुऱ्या’मुळे खरात प्रकरण आता पूर्णपणे राजकीय वळणावर येऊन ठेपले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

