बापरे! देशमुखांच्या जप्त केलेल्या ४ कोटींच्या मालमत्तेचा आजचा बाजारभाव ३५० कोटी!

ईडीने अनिल देशमुख यांचा वरळीतील एक फ्लॅट जप्त केला. तसेच जमीनही जप्त केली आहे.

67

अनिल देशमुख यांना १०० कोटी वसुलीचा आरोप चांगला अडचणीत आणत आहे. ईडीने याप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ४ कोटी २० लाखांची मालमत्ता जप्त केली आहे. मात्र त्यावेळी जप्त केलेल्या मालमत्तेचा आजचा बाजारभाव तब्बल ३५० कोटी रुपये आहे, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ईडीने अनिल देशमुख यांच्याशी संबंधित दोन मालमत्ता जप्त केल्या आहेत.

अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने मनी लाँन्ड्रिगचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात ईडीने अनिल देशमुख यांना तीनदा चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स बजावले होते. तर त्यांचा मुलगा ऋषिकेश याला एकदा समन्स बजावण्यात आले होते, मात्र, दोघेजण चौकशीसाठी हजर न राहता चौकशी टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. त्यानंतर ईडीने अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांनाही समन्स बजावले होते. त्यांनी ही हजर न राहता आवश्यक ती कागदपत्रे ईडीला सादर केली आहेत.

(हेही वाचा : पवार आणि मोदींमध्ये तासभर चर्चा… काय आहे भेटीमागचे कारण?)

ईडीकडून देशमुखांची मालमत्ता जप्त

या सर्व घडामोडींनंतर आता ईडीने अनिल देशमुख यांची मालमत्ता जप्त करायला सुरुवात केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी वरळी येथील एक फ्लॅट जप्त केला आहे. त्याची खरेदीच्या वेळची किंमत १ कोटी ५४ लाख रुपये आहे. तसेच अनिल देशमुख यांच्याशी संबंधित जमीनही जप्त करण्यात आली आहे. त्यांची किंमत आता मिळून ३५० कोटी इतकी बनली आहे. ईडीने देशमुखांची रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील धुमत गावातील ८ एकर ३० गुंठे जमीन जप्त करण्यात आली आहे. ही जमीन मोक्याच्या ठिकाणी आहे. उरण पोर्ट आणि पळस्पे फाटा दरम्यान ही जमीन आहे. संबंधित जमीन ही नव्याने सुरु होत असलेल्या नवी मुंबई विमानतळापासून काही अंतरावर आहे. मोक्याच्या ठिकाणी ही जमीन असल्याने तिचा भाव प्रचंड आहे. या ठिकाणी एका गुंठ्याचा भाव एक कोटी रुपये आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.