Devendra Fadanvis : मनसेसोबत युती होणार?, उद्धव ठाकरेंना सोबत घेणार? बामणी काव्याचा आरोप; देवेंद्र फडणवीसांची सडेतोड उत्तरे

भाजपने जेव्हापासून संभाजीराजे, उदयनराजे किंवा इतर राजघराणे सोबत जोडली, तेव्हा शरद पवार यांना या राजघराण्याचे महत्त्व पटले. तोपर्यंत त्यांना या राजघरणाच्याचे महत्त्व पटत नव्हते. जो सन्मान या राजघराण्याला द्यायला हवा होता तो दिला नाही. ठिक आहे. आता देत आहेत तर चांगले आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

336
जेव्हापासून राष्ट्रवादीत उभी फूट पडली त्यानंतर मराठा आरक्षणाचा विषय पेटला तेव्हापासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) विशेष चर्चेत आहेत. अशावेळी त्यांच्यावर एक गंभीर आरोप झाला, मनोज जरांगे पाटील यांनी, ‘फडणवीस मराठा समाजाच्या विरोधात आहेत, त्यांचा हा बामणी कावा आहे’, असा गंभीर आरोप केला. त्यावर प्रथमच देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. जरांगे पाटील हे नवीन आहेत. त्यांनी स्वतः कबुल केले की, ते उपोषण करताना काय बोलतात त्यांनाच समजत नाही, त्यामुळे त्यांना गांभीर्याने घेऊ नका. असे आरोप आपल्यावर अनेकदा होत असतात, जेव्हा आम्ही संभाजी छत्रपती यांना राज्यसभेची उमेदवारी दिली होती, तेव्हा शरद पवार यांनी ‘पूर्वी मराठे पेशव्यांची निवड करायचे आता पेशवे करत आहेत’, असे म्हटले होते, जेव्हा आपल्याविषयी बोलायला मुद्दे नसतात तेव्हा अशी जातीवादी टीका होत असते, असे फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले.

उद्धव ठाकरेंचा विश्वासघात विसरता येणार नाही 

‘टीव्ही 9 मराठी’च्या लोकसभेचा महासंग्राम कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा एकत्र येणार का, यावर बोलताना फडणवीस म्हणाले, मतभेद संपवता येतात, मनभेद नाही, अपमान विसरता येतो, पण विश्वासघात विसरता येऊ शकत नाही, त्यामुळे आता हे अंतर कमी होणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.

मनसेसोबत येणार का? 

राज ठाकरे यांच्या मनसे या पक्षासोबत युती करणार का? असा सवाल विचारण्यात आला. त्यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले, आमचे संबंध मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी आहेतच. राज ठाकरेंची हिंदुत्वाची भूमिका मान्य. त्यांची भूमिका व्यापक नव्हती, क्षेत्रीय अस्मिता अडचणीची नाही. क्षेत्रीय अस्मिता असली पाहिजे. पण प्रांतवाद म्हणजे राष्ट्रवादाला विरोध असे नाही. राज ठाकरे यांनी राष्ट्रीय अस्मिता स्वीकारली आहे. त्यामुळे त्यांचा विरोध राहिला नाही. त्यांचे आमचे विचार जुळत आहेत. पण याचा अर्थ असा नाही की आमची युती होणार आहे. मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा अशी स्थिती यायची आहे, अशी सूचक प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

…म्हणून शरद पवारांना राजघराण्यांचे महत्व पटू लागले 

श्रीमंत शाहू महाराज हे लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा रंगली आहे. शरद पवार गटाकडून ते कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून उतरण्याची शक्यता आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले, मी मोठेपणा करणार नाही. करायचा नाही. पण एक गोष्ट सांगतो. भाजपने जेव्हापासून संभाजीराजे, उदयनराजे किंवा इतर राजघराणे सोबत जोडली, तेव्हा शरद पवार यांना या राजघराण्याचे महत्त्व पटले. तोपर्यंत त्यांना या राजघरणाच्याचे महत्त्व पटत नव्हते. जो सन्मान या राजघराण्याला द्यायला हवा होता तो दिला नाही. ठिक आहे. आता देत आहेत तर चांगले आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

भुजबळ कुणाचे? 

भुजबळ कुणाचा माणूस म्हणता येईल का? मी 1989 राजकारणात आलो ते 85मध्ये मुंबईचे महापौर होते. काही बाबतीत भुजबळांचा इतिहास पाहिला तर भुजबळांचे शिवसेनेसोबत भांडण का झाले? शिवसेनेला मंडल आयोग मान्य नव्हते. मंडल आयोगासाठी त्यांनी शिवसेना सोडली. ते काँग्रेससोबत गेले. मीही माझ्या राजकारणाच्या पहिल्या दिवसापासून मी ओबीसींच्या बाजूने आहे. माझे ठाम मत आहे की सामाजिक न्याय करायचा असेल तर जसे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांना न्याय दिल्याशिवाय सामाजिक न्याय होऊ शकत नाही. तसेच ओबीसींना न्याय दिल्याशिवाय सामाजिक न्याय होऊ शकत नसल्याचे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.