Akola Lok Sabha : अकोल्यातील तिरंगी लढत कुणाच्या पथ्यावर ?

219
Akola Lok Sabha : अकोल्यातील तिरंगी लढत कुणाच्या पथ्यावर ?
Akola Lok Sabha : अकोल्यातील तिरंगी लढत कुणाच्या पथ्यावर ?
मुंबई प्रतिनिधी
तिरंगी लढत हे अकोला (Akola Lok Sabha) लोकसभा मतदारसंघाचे मागील तीन ते साडेतीन दशकांपासूनचे वैशिष्ट्य ठरले आहे. यंदाच्या निवडणुकीतदेखील भाजपाचे अनुप धोत्रे, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे अभय पाटील यांच्यात तिरंगी लढतीचा सामना रंगणार आहे. याशिवाय आणखी १२ म्हणजेच एकूण १५ उमेदवार अकोल्यातून लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत, परंतु इतर उमेदवार नावालाच असणार आहेत. (Akola Lok Sabha)
मतविभागणी भाजपाच्या पथ्यावर
या तिन्ही लढतीपैकी दोन लढतीत म्हणजेच २०१४ आणि २०१९ मध्ये देशभरात मोदी लाट जोरात होती. त्यामुळे थोत्रे यांना मिळालेल्या मतांची टक्केवारी ३८ टक्क्यांवरून ४६ टक्क्यांवर आणि त्यानंतर ४६ टक्क्यांवरुन ४९ टक्क्यांवर जाउन पोहोचली होती. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरील मतांमध्येही मोठा फरक पडला. काँग्रेस उमेदवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील मतविभागणी ही भाजपा उमेदवाराच्या पथ्यावरच पडल्याचे दिसून आले. यावेळी महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून वंचितला सामावून घेण्याचे बरेच प्रयत्न झाले, परंतु प्रकाश आंबेडकरांच्या एक ना अनेक अनाठायी अटींमुळे हे समीकरण काही जुळून आले नाही. भाजपाला एकास एक उमेदवार देण्याचा इंडिया आघाडीचा प्रयत्न देशभरात अनेक राज्यांमध्ये फिस्कटला तसाच तो महाराष्ट्रातही जुळून आला नाही. २०१९च्या लोकसभेत वंचितने महाराष्ट्रातील ४८ पैकी ४७ जागांवर उमेदवार उभे केले होते. या निवडणुकीत वंचितचा भलेही एकही उमेदवार निवडून आला नसला, तरी वंचितने ३७,४३,२०० (६.९२टक्के) मते मिळून आपला दम दाखवून दिला होता. वंचितच्या अनेक उमेदवारांनी दुसऱ्या वा तिसऱ्या क्रमांकाची मते घेउन काँग्रेसला अक्षरशः घाम फोडला होता. या यशाची पुनरावृत्ती होईल की नाही, याबाबत अनेकांच्या मनात शंका आहे. प्रकाश आंबेडकर यांनी नागपूरमध्ये न मागता काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. तरीही काँग्रेसने अकोल्यात वंचितविरोधात उमेदवार दिला आहे. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी जालन्यातून लोकसभा लढवावी यासाठी प्रकाश आंबेडकर प्रयत्नशील होते. यामाध्यमातून प्रकाश आंबेडकरांनी मराठी मतांची बेगमीही केल्याचे म्हटले जाते. आता किती टक्के मराठा मते प्रकाश आंबेडकरांच्या वाट्याला येतात, त्यांच्यात आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये दलित-मुस्लिम, अल्पसंख्यांक मतांची विभागणी किती प्रमाणात होते, अनुप धोत्रे मराठा मतांच्या जोरावर कुठपर्यंत मजल मारतात, याची सर्वांनाच उत्सुकता असणार आहे. (Akola Lok Sabha)
अकोला मतदारसंघाचा इतिहास
१९५२ सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून (Lok Sabha Elections) ते १९८४ पर्यंत अकोला मतदारसंघ हा काँग्रेसचा गड राहिला आहे. काँग्रेसच्या या गडाला सर्वात पहिल्यांदा खिंडार पाडण्याचे काम केले ते भाजपाचे दिवंगत नेते पांडुरंग फुंडकर यांनी. १९८९, १९९१ आणि १९९६ असे सलग तीन टर्म म्हणजे १५ वर्षे हा मतदारसंघ ताब्यात ठेवून पांडुरंग फुंडकर यांनी काँग्रेसचे वर्चस्व मोडून काढले. अकोला मतदारसंघात भाजपाचे पक्ष संघटन मजबूत होत असताना याच काळात दलित-मुस्लिम व इतर मागासवर्गीय जाती, समूहांना एकत्र घेत अॅड. प्रकाश आंबेडकर अकोला पॅटर्न राबवत होते. याच अनोख्या पॅटर्नच्या जोरावर अॅड. प्रकाश आंबेडकर १९९८/९९ सालच्या लोकसभेत निवडून गेले, मात्र हा अकोला पॅटर्न अपवाद ठरला. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांना अशी जादू पुन्हा करून दाखवता आली नाही. ते या मतदारसंघात कधी दुसऱ्या, तर कधी तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. २००४ पासून भाजपाचे संजय धोत्रे यांनी या मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व राखले आहे. दोन दशकांपासून या मतदारसंघावर भाजपाचाच झेंडा फडकत आहे. जवळजवळ १९ लाख मतदार असलेल्या या मतदारसंघात अकोट, बाळापूर, मूर्तिजापूर, अकोला पूर्व, आणि अकोला पश्चिम हे पाच विधानसभा क्षेत्र अकोला जिल्ह्यातील आणि रिसोड हे विधानसभा क्षेत्र वाशिम जिल्ह्यातील अशा सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. यातील अकोला पूर्व, अकोला पश्चिम, अकोट आणि मूर्तीजापूर हे चार मतदारसंघ भाजपाकडे आहेत, तर बाळापूर हा मतदारसंघ उबाठा शिवसेनेकडे आणि रिसोड हा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. हे बघता आज तरी या मतदारसंघात भाजपाचे वर्चस्व चांगले आहे असे म्हणता येते. (Akola Lok Sabha)
अकोल्यातील जातीय समीकरणाचा धुरळा
अकोला मतदारसंघात (Akola Constituency) मराठा समाजाचे प्राबल्य आहे. त्या खालोखाल दलित, मुस्लीम, ओबीसी, माळी, धनगर, आदिवासींची मते आहेत. मागच्या तीन लढतीची आकडेवारी बघितल्यास काँग्रेस उमेदवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील मतविभागणी भाजपाच्या पथ्यावर पडलेली दिसून येते. त्यातही काँग्रेसने २०१४ व २०१९ साली हिदायतुल्ला पटेल या अल्पसंख्याक उमेदवाराला संधी दिल्यामुळे अकोल्यात जातीय समिकरणाचा धुरळा उडाला होता. परिणामी भाजपाचे संजय धोत्रे विक्रमी मताधिक्याने निवडून आले होते. २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीत अकोला मतदारसंघात ४९.९१ टक्के (७,३८,९५५) मतदान झाले होते. यापैकी भाजपचे संजय धोत्रे २,८७,५२६ (३८.९१टक्के) मते घेउन विजयी झाले होते. भारिप बहुजन महासंघाच्या प्रकाश आंबेडकर २,२२,६७८ (३०.१३ टक्के) मतांसहीत दुसऱ्या क्रमांकावर होते. तर काँग्रेसचे बाबासाहेब धाबेकर १,८२,७७६ (२४.७३ टक्के) मते घेत तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. धोत्रे आणि आंबेडकर यांच्यातील मतांचा फरक अवघा ६४,८४८ (८.७८ टक्के) इतकाच होता. २०१४ मध्ये संजय धोत्रे ४,५६,४७२ (४६.६४टक्के) मतांसह पहिल्या क्रमांकावर, काँग्रेसचे हिदायतुल्ला पटेल २,५३,३५६ (२५.८९ टक्के) मतांसहीत दुसऱ्या, तर भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर २,३८,७७६ (२४.४० टक्के) मतांसहीत तिसऱ्या क्रमांकावर राहिले. येथेही धोत्रे आणि पटेल यांच्यातील मतांचा फरक हा २,०३, ११६ (२०.७५ टक्के) एवढा होता, तर २०१९च्या लढतीत संजय धोत्रे ५,५४,४४४ (४९.५३टक्के) मतांसह पहिल्या क्रमांकावर, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर २,७५,५९६ (२४.९१टक्के) मतांसह दुसऱ्या आणि काँग्रेसचे हिदायतुल्ला पटेल २,५४,३७० (२२.७२ टक्के) मतांसहीत तिसऱ्या क्रमांकावर होते. यावेळी थोत्रे आणि आंबेडकर यांच्यात २,७५,५९६ (२४.६२ टक्के) इतक्या मतांचा फरक होता. (Akola Lok Sabha)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.