नगर रुग्णालयातील आग ही दुर्घटना नसून हत्याकांड!

आणखी किती निष्पाप रुग्णांचा बळी घेतल्यावर आपल्या सरकारला व मंत्र्यांना जाग येणार आहे? असा सवाल अतुल भातखळकर यांनी केला.

72

अहमदनगर शासकीय रुग्णालयातील आग ही दुर्घटना नसून महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळे घडलेले हत्याकांड होय. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह या घटनेस जबाबदार असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करा, अशी मागणी भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.

पत्राद्वारे ‘ही’ केली मागणी

अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत झालेल्या ११ रुग्णांच्या मृत्यूस केवळ महाभकास आघाडी सरकार जबाबदार असून, ही दुर्घटना नसून आरोग्य विभागाच्या निष्क्रियतेमुळे घडलेले हत्याकांड असल्याची टीका भातखळकरांनी केली आहे. भंडारा येथील शासकीय रुग्णालयात आगीच्या घटनेच्या वेळी नेमण्यात आलेल्या समितीने अहवाल सादर करून आज १० महिने उलटून गेले तरीही महाविकास आघाडी सरकारने त्यातील एकाही सूचनेची अंमलबजावणी केलेली नसल्यानेच अहमदनगर येथील हत्याकांड घडले आहे, त्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह या घटनेस जबाबदार असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी आग्रही मागणी भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.

(हेही वाचा : नगर रुग्णालय आग : आरोग्य आणि सार्वजनिक बांधकाम विभाग आमने-सामने)

सरकारला आणि मंत्र्यांना कधी येणार जाग?

९ जानेवारी रोजी भंडारा येथील शासकीय रुग्णालयात आगीची घटना घडल्यानंतर नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने जानेवारीमध्येच सरकारला अहवाल सादर करून राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय रुग्णालयांमध्ये तात्काळ सुधारणा करण्यासाठी अत्यंत महत्वाच्या १५ सूचना केल्या होत्या. परंतु त्यातील एकाही सूचनेची ठाकरे सरकारने अंमलबजावणी केलेली नाही. केवळ वसुली व टक्केवारी मध्ये मग्न असलेल्या सरकारने एकाही शासकीय रुग्णालयाचे फायर ऑडीट केले नाही, कोणत्याही शासकीय रुग्णालयात अग्निरोधक यंत्रणा बसविण्यासाठी व सुधारण्यासाठी निधी दिला नाही. मागील वर्षभराच्या काळात ७ रुग्णालयांमध्ये आग लागून ७८ रुग्णांचा बळी गेला. घटनेनंतर ,आम्ही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे, चौकशी करून दोषींवर कारवाई करू, अशी मोघम व वेळकाढू वक्तव्ये करायची, परंतु प्रत्यक्ष कृती करताना हाताला लकवा मारल्याप्रमाणे थंड राहायचे असा एककलमी कार्यक्रम महाविकास आघाडी सरकारने चालविला आहे. मुख्यमंत्री महोदय, आणखी किती निष्पाप रुग्णांचा बळी घेतल्यावर आपल्या सरकारला व मंत्र्यांना जाग येणार आहे? असा सवालसुद्धा अतुल भातखळकर यांनी यावेळी केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.