उपनगर गलिच्छ आणि शहर स्वच्छ ? : केवळ अर्ध्या मुंबईत राबवली जाणार स्वच्छता मोहिम

113

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असले तरी दोन्ही पक्षाच्यावतीने वेगवेगळ्या प्रकारचे अजेंडे राबवले जात आहेत. बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप युतीचे सरकार असले तरी मुंबईत राबवणाऱ्या योजना या दोन्ही पक्षांकडून वेगवेगळ्या धोरणानुसार राबवल्या जात असल्याचा प्रत्यय मागील दोन दिवसांमध्ये दिसून आला आहे. उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी उपनगरातील महापालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये ०१ ते ३१ डिसेंबर या कालावधीत स्वच्छता मोहिम राबवण्याची घोषणा केली. महापालिकेच्या मदतीने शासकीय यंत्रणांसह ही स्वच्छता मोहिम महिनाभर राबवली जाणार असून दोन दिवसांपूर्वी शहराच्या पालकमंत्र्यांनीही महापालिकेसोबत आढावा बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी अशाप्रकारची कोणतीही घोषणा केली नाही. त्यामुळे एकाच वेळी अर्ध्या मुंबईत स्वच्छता मोहिम राबवली जाणार असून मुंबई शहर स्वच्छ आणि उपनगर गलिच्छ आहे का असा सर्वसाधारण समज मुंबईकरांच्या मनात निर्माण झाला आहे.

( हेही वाचा : दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती! अन्यथा परीक्षा देता येणार नाही )

‘स्वच्छ मुंबई स्वस्थ मुंबई अभियान मुंबई उपनगर जिल्ह्यातील १५ वॉर्ड मध्ये १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणार असल्याची घोषणा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली. शासनाचे सर्व विभाग, स्वयंसेवी संस्था, विविध सामाजिक कार्य करणाऱ्या संघटना तसेच नागरिकांनी या अभियानात श्रमदान करून हा उपक्रम यशस्वी करावा असे आवाहन पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.

‘स्वच्छ मुंबई स्वस्थ मुंबई अभियान ‘या विषयी मुंबई महानगर प्रदेश विकास चे कार्यालय येथे पूर्व तयारी बाबत बुधवारी बैठक घेतली. यावेळी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी,मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आशिष शर्मा, मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त चंदा जाधव, विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष दळवी,जिल्हा नियोजन अधिकारी भूषण देशपांडे यासह विविध शासकीय विभागांचे अधिका-यांबरोबरच विविध क्षेत्रातील सामाजिक संस्था, एनजीओ, असोसिएशनस्चे पदाधिकारी उपस्थित होते.

तर त्या आधी दोन दिवस अगोदर दिवशी म्हणजे सोमवारी महापालिका मुख्यालयात शहराचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी महापालिकेसह शहराचे जिल्हाधिकारी यांच्यासोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये राज्य शासन, जिल्हा वार्षिक योजना तसेच महानगरपालिका अशा विविध यंत्रणांच्या माध्यमातून मुंबईकरांसाठी मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. तथापि, आवश्यकतेनुसार नाविण्यपूर्ण योजनेतून शहरातील विविध भागांमध्ये मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे दीपक केसरकर यांनी सांगितले. मुंबई महानगरपालिकेमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा पालकमंत्री केसरकर यांनी मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे झालेल्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे, आशीष शर्मा, पी. वेलरासू, डॉ. संजीव कुमार, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, जिल्हा नियोजन अधिकारी सुपेकर, महानगरपालिकेतील संबंधित विभागांचे उपायुक्त, सहायक आयुक्त उपस्थित होते.

उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा हे भाजपचे असून शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर हे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आहेत. परंतु एकाच सरकारमधील दोन्ही पक्षांचे अजेंडे हे वेगवेगळे चालवले जात आहे. उपनगराचे पालकमंत्री लोढा यांनी स्वच्छतेची मोहिम राबवण्याचा निर्णय घेतला असला तरी शहराचे पालकमंत्री यांना शहरात अशाप्रकारची मोहिम राबवण्याची घोषणा महापालिकेच्या आढावा बैठकीनंतरही केली नाही. त्यामुळे दोन्ही पक्ष सरकारमध्ये असले तरी मुंबईत मोहिम राबवताना दोन्ही पक्षांचे सुत जुळून येत नसल्याचे दिसून येत आहे, तसेच दोन्ही पक्ष एकमेकांना विचारात घेऊन काम करत नसल्याचेही दिसून येत आहे.

विशेष म्हणजे या योजनेची घोषणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून होणे आवश्यक होते. परंतु याची घोषणा भाजपचे लोढा यांनी उपनगराचे पालकमंत्री म्हणून उपनगरांपुरती केल्यामुळे केवळ उपनगरातच स्वच्छता मोहिम राबवण्याची गरज आहे आणि शहरात स्वच्छतेची गरज नाही असा संदेश पालकमंत्र्यांनी देण्याचा प्रयत्न तर केला नाही ना असा सवाल उपस्थित होत आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.