Veer Savarkar : ‘शिदोरी’वरील कारवाईची भूमिका स्वागतार्ह; राहुल गांधींवर दखलपात्र गुन्हा दाखल करा – रणजित सावरकर यांची मागणी

112

काँग्रेसचे मुखपत्र ‘जनमानसाची शिदोरी’ या मासिकाच्या फेब्रुवारी २०२० या अंकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करणारे दोन लेख प्रसिद्ध करण्यात आले होते, ज्यावर राज्यभरात संताप व्यक्त करण्यात आला होता. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी या प्रकरणी ‘शिदोरी’ मासिकावर कारवाई करण्याची मागणी केली होती; मात्र त्यावेळी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले; परंतु शिंदे-फडणवीस सरकारने याची गांभीर्याने दखल घेतली आहे. चालू पावसाळी अधिवेशनात विधानसभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘शिदोरी’ मासिकावर कारवाई करण्यात येईल, अशी भूमिका मांडली. गृहमंत्री फडणवीस यांनी मांडलेल्या या भूमिकेचे रणजित सावरकर यांनी स्वागत केले, मात्र त्याच बरोबर महाराष्ट्रात येऊन राहुल गांधी यांनी ज्या प्रकारे वीर सावरकर यांच्यावर खोटे आरोप करून त्यांची बदनामी केली होती, त्याही प्रकरणी राहुल गांधी यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी रणजित सावरकर यांनी केली आहे.

काय म्हणाले रणजित सावरकर?

वीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक लेख प्रसिद्ध केल्याप्रकरणी ‘जनमानसाची शिदोरी’ या मासिकावर कारवाई करण्याची भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडली, याचे मी स्वागत करतो. परंतु त्याच बरोबर भारत जोडो यात्रेच्या वेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात येऊन वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केला होता, त्यांच्यावर खोटे आरोप करून त्यांची बदनामी केली होती. त्याही प्रकरणी राहुल गांधी यांच्या विरोधात मी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीचीही दखल घेऊन राहुल गांधी यांच्याविरोधात दखलपात्र गुन्हा दाखल करावा, अशी अपेक्षा रणजित सावरकर यांनी व्यक्त केली आहे.

(हेही वाचा https://www.marathi.hindusthanpost.com/politics/chief-minister-eknath-shinde-should-take-action-against-congress-magazine-shidori-ranjit-savarkar/)

काय आहे ‘शिदोरी’ मासिकाचे प्रकरण?

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुखपत्र असलेल्या ‘जनमानसाची शिदोरी’ या मासिकाच्या फेब्रुवारी २०२०च्या अंकात ‘स्वातंत्र्यवीर नव्हे, माफीवीर’ आणि ‘अंधारातील सावरकर’ असे दोन लेख छापण्यात आले होते. अत्यंत विकृत मनोवृत्तीने लिहिलेले आणि शंभर टक्के असत्यावर आधारित, वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे हे लेख वीर सावरकरांची मानहानी करणारे आहेत. त्यात ज्या वीक मासिकातील लेखांचा संदर्भ देण्यात आला आहे त्याबाबत न्यायालयात खटला दाखल आहे. त्यामुळे वीर सावरकरांची बदनामी करणाऱ्या ‘शिदोरी’ मासिकवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी सावरकरप्रेमींकडून करण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने १३ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंदर्भात पत्रही देण्यात आले. या मासिकावर त्वरित बंदी घालून, लेख लिहिणाऱ्या लेखकांना आणि ते छापणाऱ्या संपादकांना अटक करावी, अशी मागणी त्यातून करण्यात आली. मात्र, ठाकरेंनी काँग्रेसच्या मुखपत्रावर कोणतीही कारवाई केली नाही.

काय आहे राहुल गांधी यांच्याविरोधातील तक्रार?

राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करत त्यांचा अपमान केला होता. त्याविरोधात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यानी १७ नोव्हेंबर २०२२ रोजी दादरच्या शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीची नोंद घेत आता पोलिसांनी रणजित सावरकर यांचा जबाब नोंदवून घेतला आहे.

राष्ट्रपुरुषांची बदनामी आणि चारित्र्यहनन या आरोपाखाली राहुल गांधी आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रणजित सावरकर यांनी आपल्या तक्रारीत केली आहे. तसेच याआधीही राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबाबत केलेल्या विधानाबाबतची तक्रार भोईवाडा न्यायालयात प्रलंबित असून, न्यायालयाने दिल्ली पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आता राहुल गांधी यांच्यावरही दखलपात्र गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रणजित सावरकर यांनी केली आहे.

(हेही वाचा https://www.marathi.hindusthanpost.com/politics/dadar-shivaji-park-police-get-statement-of-ranjit-savarkar-against-rahul-gandhis-complaint-for-veer-savarkars-insult/)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.