पोलिसांसाठी राज्यात मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती करणार – मुख्यमंत्री

100

कायदा-सुव्यवस्थेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिसांसाठी राज्यात मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मुंबई पोलिसांसाठी ५० हजार घरांची गरज

मालेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, मालेगाव कॅम्प पोलीस ठाणे व २०५ पोलीस निवासस्थाने यांच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पोलीसांच्या प्रश्नांच्या बाबतीत हे सरकार संवेदनशील आहे. पोलीसांच्या घरांच्या बाबतीत मुंबईत बैठक घेण्यात आली आहे. येत्या काळात शासनाच्या सर्व गृहनिर्माण महामंडळाच्या माध्यमातून पोलिसांच्या घरांची मोठ्या प्रमाणात निर्मिती करण्यात येईल. मुंबई पोलिसांसाठी ५० हजार घरांची गरज आहे. मात्र सध्या १९ हजार घरे उपलब्ध आहेत. सद्यस्थितीतील घरांच्या डागडुजी व देखभालीची नितांत आवश्यकता आहे. त्या दृष्टीने शासन काम करत आहे.

सध्याचे सरकार हे सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी यांचे सरकार आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यातील अतिवृष्टीच्या पंचनाम्याचे काम शंभर टक्के झाले आहे. अशा शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासन युद्ध पातळीवर काम करत आहे. लवकरच शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचणार आहे. सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना आश्वास्त केले.

( हेही वाचा : घड्याळाच्या अलार्म करून दिली सुषमा अंधारेंना शिवसेना प्रवेशाची जाग)

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. पेट्रोल-डिझेल वरील व्हॅट कपात करून पाच रुपयांनी दर कमी करण्यात आला आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना ग्रीडद्वारे पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प सुरू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. सरकारचा संकल्प लोकहिताचे कामे करण्याचा आहे. लोकांच्या प्रश्नांना प्रथम प्राधान्य हे शासनाचे ध्येय आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच मालेगाव येथील पोलिसांसाठीचे ५४ कोटी ४९ लाख खर्चून सुसज्ज निवासस्थान झाले आहे. उर्वरित अधिकारी -कर्मचाऱ्यांसाठी आणखी निवासस्थाने मंजूर करावीत. तसेच पोलीस शिपाई भरती करावी अशी मागणी आमदार दादा भुसे यांनी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.