गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपसमोर मोठा पेच, एकाच जागेसाठी 35 जणांनी मागितली उमेदवारी

108

सध्या गुजरात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. यासाठी सत्ताधारी भाजपकडून तिकीट वाटपासाठी सर्व्हे करण्यात येत आहे. कोणत्या जागेसाठी कोणाला उमेदवारी द्यायची यासाठी तीन दिवस निरीक्षकांना गुजरातमधील विविध मतदारसंघांत पाठवण्यात आले आहे. पण असे असताना एका मतदारसंघातील जागेने मात्र भाजपसमोर मोठा पेच निर्माण केला आहे.

गुजरातच्या अरवल्ली जिल्ह्यातील मोडासा विधानसभा मतदारसंघातील जागेवर भाजपच्या तब्बल 35 नेत्यांनी दावा ठोकला असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या या जागी काँग्रेसचे राजेंद्र सिंह ठाकोर हे आमदार असून ही जागा जिंकण्यासाठी भाजप नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

(हेही वाचाः ‘आता बास झालं, तुमची वेळ संपली…’, अमित शहांनी गृहमंत्र्याला झापले! पहा व्हिडिओ)

का आहे जागेचे महत्व?

या मदतारसंघातील जागा ही 2007 मध्ये भाजपकडे होती. पण 2012 आणि 2017 मध्ये याठिकाणी काँग्रेसचा आमदार निवडून येत आहे. त्यामुळे ही जागा पूर्वी भाजपचीच असल्याने या जागेवर भाजप उमेदवारांची निवडून येण्याची इच्छा आहे. त्यामुळे इतर मतदारसंघातील भाजप नेतेही याच जागेवर दावा करत आहेत. या प्रकारामुळे मोडासा मतदारसंघात पोहोचलेल्या निरीक्षकांचे तब्बल आठ तास नेत्यांची समजूत काढण्यात वाया गेले असल्याचे सांगण्यात येत आहे.

एकाच जागेसाठी इतकी गर्दी का?

2017 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत मोडासा येथून काँग्रेसचे राजेंद्र सिंह ठाकोर हे केवळ 1 हजार 640 मतांनी विजयी झाले होते. यावेळी आम आदमी पक्षाने गुजरात निवडणुकीवर आपले लक्ष केंद्रित केल्याने या जागेवरही आप आपला उमेदवार देईल. त्यामुळे काँग्रेस आणि आपमध्ये मतांचे विभाजन होऊन ही जागा भाजपच्या खिशात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळेच या जागेसाठी भाजप नेत्यांचा आटापिटा चालू आहे.

(हेही वाचाः अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक रद्द होणार? निवडणूक आयोग काय करणार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.