राज्यपाल आणि ठाकरे सरकारच्या संघर्षाचे पोलीसही ठरलेत बळी!

76

ठाकरे सरकार सत्तेत आल्यापासून, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि ठाकरे सरकार यांच्यामधील वाद वाढतच गेले. त्याचा परिणाम म्हणून, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी रखडणे, ओबीसी आरक्षणासंबंधी अद्यादेशाला तातडीने स्वाक्षरी न देणे, राज्यपालांचे विद्यापीठांवरील नियंत्रण कमी करण्याचा कायदा मंजूर करणे, राज्यपाल आणि ठाकरे सरकार यांच्यात आरोप प्रत्यारोप होणे, राज्यपालांना धमकीवजा इशारा देणारी पत्रे मुख्यमंत्री कार्यालयाकडून येणे, असे सर्व प्रकार दोन्ही बाजूने घडत आहेत. यामध्ये अनेक घटक बळी पडत असताना, राज्यातील 200 पोलीसही या संघर्षाचे बळी ठरले आहेत. मागच्या दोन वर्षांपासून घोषित झालेल्या राष्ट्रपती पुरस्कारापासून 200 पोलिसांना वंचित राहावं लागत आहे.

 40 पदकं जाहीर होण्याची शक्यता

केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे प्रत्येक वर्षी स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती पोलीस पदक, पोलीस शौर्य पदक तसेच प्रशंसनीय सेवेसाठी पोलीस पदके जाहीर केली जातात. त्यानंतर राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाकडून या पदक वितरण कार्यक्रमाची आखणी होते. महासंचालकांच्या प्रस्तावानुसार गृहमंत्रालय राज्यपालांची वेळ घेतात. त्यानंतर पदकविजेत्यांच्या कुटुंबीयांसह राजभवनावर या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. सन 2019 मध्ये प्रजासत्ताक दिनाला 40, तर स्वातंत्र्य दिनाला 39, पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांना पोलीस पदके जाहीर झाली होती. अशाच प्रकारे  2020 आणि 2021 मध्येही प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्य दिनाला मिळून सुमारे 200 पदके राज्यातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना जाहीर झाली आहेत, तर येत्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आणखी 40 पदके जाहीर होण्याची शक्यता आहे.

( हेही वाचा: राज्यातील तब्बल इतके शिक्षक वेतनापासून वंचित, दिला तीव्र आंदोलनाचा इशारा! )

पदक विजेत्यांमध्ये नाराजी

राष्ट्रपती पदक हे प्रत्येक पोलिसासाठी मोठा गौरव आणि अभिमानाची बाब असते. त्यामुळे पदक जाहीर झाल्यानंतर, काही काळात राज्यपालांच्या हस्ते त्याचे वितरण होते. मात्र सरकार आणि राज्यपाल यांच्यातील संघर्ष तसेच पोलीस दलात गेल्या काही महिन्यांतील गोंधळाची परिस्थिती यामुळे या पदक वितरण सोहळ्याकडे कोणाचेच लक्ष गेलेले नाही. त्यामुळे पदक विजेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. याबाबत अतिरिक्त पोलीस महासंचालक (प्रशासन) अनुप कुमार सिंह यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे हा कार्यक्रम होऊ शकला नाही. या कार्यक्रमास पदक विजेते व त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने येत असतात, पण कोरोना असल्याने हा कार्यक्रम होऊ शकलेला नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.