…तर दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सत्य उघड करेन  

366

IMG 20200915 WA0114

नितेश राणे यांचा इशारा

सुशांत सावंत

अभिनेता सुशांत सिंह राजपूत हत्येचा तपास उलघडत नाहीत तोच आता सुशांतची एक्स मॅनेजर हिच्या आत्महत्येचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. दिशाच्या मृत्यूमागील जे काही सत्य आहे ते तिचा प्रियकर रोहन राय याला माहित आहे, त्याने जर ते सीबीआयला सांगितले नाही तर आपण स्वतः हे सत्य सीबीआयला सांगणार आहे, असा इशारा नारायण राणे यांचे पूत्र नितेश राणे यांनी याबाबत ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना दिला. ज्या रात्री दिशाचा मृत्यू झाला होता त्या आधी एक पार्टी झाली त्यामध्ये एका  मोठ्या राजकीय नेत्याचाही सहभाग होता, असेही राणे यांनी सांगितल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

रोहन राय याने मुंबईत यावे, त्याला मी संरक्षण देईन. त्याने घाबरू नये, त्याने सीबीआयला सर्व काही खरे सांगावे. रोहन रायची चौकशी केल्यास सत्य सर्वांसमोर येईल, असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे. ८ जून रोजी जूहू येथे एक पार्टी झाली होती. त्या पार्टीमध्ये एक मोठा बिल्डर, दोन अभिनेते, एका अभिनेत्रीचा भाऊ आणि एक मोठा राजकीय नेता उपस्थित होता. याच पार्टीच्या दिवशी रात्री दिशाचा मृत्यू झाला. दिशाला या पार्टीत बोलविण्यात आले होते, पण तिला या पार्टीत जायची इच्छा नव्हती. या दोन्ही घटनांचा परस्पर संबंध आहे का, याचीही चौकशी करण्यात यावी. जर दिशाने आत्महत्या केली असेल, तर मग रोहन राय, त्याचे मित्र, शेजारी आणि इमारातीचा वॉचमन ही सर्व मंडळी इतके घाबरून का राहत आहेत?, असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

दिशासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणारा रोहन राय जे पुरावे लपवत आहे ते माझ्याकडे आहेत. रोहनने सीबीआयला सत्य सांगितले नाही तर मी ते सत्य सांगेन. दिशासोबत राहणारा रोहन गायब का झाला आहे? जेव्हा दिशा इमारतीवरून खाली पडली, तेव्हा रोहन तिथे २५ मिनिटांनी का आला?, अशी प्रश्नांची सरबत्ती राणे यांनी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.