हिराबा गेल्या; जाताना आपल्या मनावरची मरगळ झटकून गेल्या

185

हिराबा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोतोश्रींचं दिनांक ३० डिसेंबर २०२२ रोजी निधन झालं. हिराबा १०० वर्षांच्या होत्या. त्या दीर्घ आयुष्य जगल्या आणि समृद्धपणे जगल्या. राजमाता कशी असावी याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हिराबा. कोणत्याही प्रकारचं राजकीय वक्तव्य हिराबांनी कधी केलं नाही, आपला मुलगा मुख्यमंत्री, पंतप्रधान असताना देखील त्यांनी मुलाच्या पदाचा गैरफायदा घेतला नाही. साध्वी सारखं जीवन त्या जगल्या.

( हेही वाचा : बोलीभाषा एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी रंगणार शिवाजी मंदिरमध्ये! )

कॉंग्रेसमध्ये राहुल गांधी युवराज आहेत आणि म्हणून सोनिया गांधींना राजमाता म्हणण्याची प्रथा आहे. अनेक राजकीय कुटुंबात त्यांच्या राजमाता राजकारणात सक्रिय नसून देखील राजकीय पदाचा फायदा करुन घेताना दिसतात. बाळासाहेबांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यास अपवाद ठरतील. त्यांनी कधीही आपल्या पतीच्या राजकीय पदाचा गैरफायदा उचलला नाही. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर त्यांनी मुलांप्रमाणे प्रेम केलं. हिराबा मात्र अनेक गोष्टींपासून अलिप्त राहिल्या.

हिराबांचे भारतावर खूप उपकार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून आपल्याला कळतं की हिराबांनी त्यांच्यावर किती चांगले संस्कार केले असतील. राजमाता हा शब्द उच्चारताच आपल्यासमोर जिजाऊ उभ्या राहतात. जिजाऊंनी शिवरायांना घडवून भारतावर खूप उपकार केले. भारताचा इतिहास बदलला. शिवराय जन्माला आले नसते तर सबंध हिंदुस्थानाचा पाकिस्तान झाला असता. परंतु छत्रपतींनी अतिरेकी प्रवृत्तीच्या आक्रमकांच्या मनात भीती निर्माण केली. हिंदवी स्वराज्य स्थापन करुन त्यांनी हिंदूंना हिंदू राहण्याचा अधिकार दिला. कवी भूषण यांनी आपल्या कवितेतून छत्रपतींच्या कार्याचा गौरव केला आहे,

काशी की कला हो जाती,
मथुरा में मस्जिद बस्ती,
अगर शिवाजी न होते
तो सुन्नत होती थी सबकी

जिजाऊंचा आदर्श हिराबांनी घेतला होता आणि नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला आहे. १९४७ रोजी आपल्याला स्वराज्य मिळाले, आता सुराज्य निर्माण करायचे आहे. या एकाच ध्येयाने नरेंद्र मोदींना पछाडले आहे. यामागे त्यांच्या मातोश्रींची तपश्चर्या आहे. २०१४ पासून हिराबांचे आणि मोदींचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. तेव्हा मोदींवर टीका झाली की ते आपल्या आईला भेटायला जाताना देखील पत्रकारांना सोबत घेऊन जातात. एक गोष्ट या टिकाकारांनी लक्षात घेतली पाहिजे की मोदी हे पंतप्रधान तर आहेत परंतु गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून डावी मीडिया मोदींच्या मागे हात धुवून लागली आहे. मोदींना नकारात्मक प्रसिद्धी देण्यात डाव्या मीडियाचा मोलाचा वाटा आहे. या नकारात्मक प्रसिद्धीला मोदींनी सकारात्मक बनवले इतकेच!

हिराबांचं आपल्या मुलावर नितांत प्रेम होतं आणि मोदी देखील मातृभक्त आहेत. हिराबांनी आपल्या मुलाच्या राजकीय पदाचा कधीच फायदा अथवा गैरफायदा घेतला नाही. एक सामान्य नागरिक म्हणून त्यांनी जीवन व्यतीत केलं. मला नोट बंदीच्या काळातली घटना आठवतेय. नोट बंदीच्या वेळेस हिराबा रांगेत उभ्या दिसल्या आणि तो फोटो प्रचंड व्हायरल झाला. कुणी म्हटलं की मोदींनी आपल्या आईला या वयात रांगेत उभं केलं तर कुणी याला पॉलिटिकल स्टंट म्हटलं. आपल्या कुटुंबाच्या राजकीय पदाचा गैरफायदा घेत, राजकीय मलाई खाण्यात मशगुल असणार्‍या संस्कृतीला या घटनेचा अर्थ कळणार नाही.

एका सामान्य धोब्याचं म्हणणं रामाने गांभीर्याने घेतलं. रामाच्या राजेशाहीत धोब्याला सुद्धा आपलं मत मांडण्याचा अधिकार होता हे या गोष्टीतून कळतं. परंतु या गोष्टीतही नकारात्मकता शोधणारे कैक आहेत. हिराबा रांगेत उभ्या राहिल्या याचा अर्थ असा आहे की मी पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदींची आई आहे. एक फोन फिरवला तर माझं काम होऊ शकतं. परंतु त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे मी केवळ एक सामान्य नागरिक आहे आणि इतरांना जे अधिकार आहेत त्यापेक्षा कमी अथवा जास्त अधिकार मला नाहीत हा संदेश हिराबांनी दिला होता. राजकीय नेत्यांच्या नतेवाईकांनी कसं वागायचं हा आदर्श हिराबांनी घालून दिला. दुसरी गोष्ट नोटबंदीच्या काळात एक नकारात्मक वातावरण निर्माण करण्यात आलं होतं. हिराबांनी रांगेत उभं राहून आपल्या मनावरची मरगळ दूर केली. त्या एका लहानशा घटनेने भारतीयांच्या मनात चैतन्य स्फुरलं. “राजमाता रांगेत उभी होती, ही घटना सामान्य नाही. हा आदर्श आहे. आता मातोश्रींचं निधन झाल्यानंतरही, सगळी कर्तव्ये पार पाडून मोदी पुन्हा कामाला लागले आहेत. हे त्यांच्या मातोश्रींचे संस्कार आहेत. त्यांनी आपला सुपुत्र या देशाला अर्पण केला. या सुपुत्राने खर्‍या अर्थाने भारत जोडला आहे. हिराबांविषयी लिहिताना शब्द अपुरे पडतील असं त्यांचं जीवन होतं…

हिराबा यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि वंदन!

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.