The Kerala Story Movie Review: हिंदूंना अंतर्मुख करायला लावणारा चित्रपट!

667
The Kerala Story Movie Review: हिंदूंना अंतर्मुख करायला लावणारा चित्रपट!
The Kerala Story Movie Review: हिंदूंना अंतर्मुख करायला लावणारा चित्रपट!

-श्रुतिका कासार

वादाच्या भोवऱ्यात अडकलेला ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट अखेर प्रदर्शित झाला. या चित्रपटातून हिंदू मुलींचे धर्मांतरण, लव्ह जिहाद, इसिस दहशदवाद हे मुद्दे अधोरेखित करण्यात आले आहेत. पॅरामेडिकल कॉलेजात शिकण्यासाठी हॉस्टेलच्या एका खोलीत असलेल्या इतर तीन तरुणींसोबत राहायला आलेली शालिनी उन्नीकृष्णन ही चित्रपटाची मुख्य नायिका आहे. केरळी हिंदू कुटुंबात वाढलेली निरागस शालिनी इसिस दहशतवादाच्या सापळ्यात सापडते आणि मग तिच्या आयुष्याची कशी फरफट होते ही या चित्रपटाची साधारण कथा आहे. ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतरासारखा विषय चित्रपटाच्या माध्यमातून मांडला गेला ही कौतुकाची बाब आहे. या सगळ्या गोष्टी आजूबाजूला घडत असल्या तरी त्यावर काहीच बोलले जात नाही अशा वेळी या चित्रपटाची निर्मिती करणे फार धाडसाचे काम आहे. (The Kerala Story Movie Review)

काय आहे कथानक?

हा चित्रपट पाहिल्यानंतर जी एक गोष्ट प्रामुख्याने अधोरेखित करावीशी वाटते त्यावर प्रकाश टाकूया. शालिनी, गीतांजली, निमा आणि आसिफा या चार मैत्रिणींच्या माध्यमातून चित्रपटाची कथा पुढे सरकत राहते. शालिनी ही हिंदू, गीतांजली ही कम्युनिस्ट, निमा ख्रिश्चन आणि आसिफा मुस्लिम दाखवली आहे. सगळ्या धर्मांपेक्षा, सगळ्या देवीदेवतांपेक्षा ‘अल्लाह’ कसा सर्वश्रेष्ठ आहे हे जाणीवपूर्वक आसिफा आपल्या मैत्रिणींच्या मनावर सतत बिंबवत असते. यावेळी ‘ज्या देवाचा पुत्र सुळावर चढवला जातो आणि त्या मुलाला स्वतः देव वाचवू शकत नाही असा देव तुम्हाला काय वाचवणार?’ आणि ‘जो देव आपल्या मृत पत्नीला घेऊन मदतीच्या शोधात वणवण भटकतो तो देव तुमची काय मदत करणार?’ असे प्रश्न विचारत आसिफा अल्लाह कसा सर्वश्रेष्ठ आहे हे सांगतांना दिसते. दुर्दैवाने तिने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे शालिनी आणि गीतांजली यांच्याकडे नसतात. त्या क्षणापासून त्यांच्या धर्मांतराची खऱ्या अर्थाने सुरुवात होते.

(हेही वाचा – केरळ स्टोअरीची दुसरी बाजू; पुण्याच्या विद्यार्थ्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ते दहशवादी प्रशिक्षण)

पालकांची चूक (The Kerala Story Movie Review)

चित्रपटातला हा सीन पाहिल्यानंतर सुशिक्षित हिंदू घरातील मुलींना आपल्या धर्माबद्दल काहीच कसे माहित नाही हे पाहून चीड येते आणि मुस्लिम धर्माला नाव ठेवण्यापेक्षा आपल्या आजच्या पिढीला हिंदू धर्म शिकण्याची, समजून घेण्याची, आत्मसात करण्याची किती नितांत गरज आहे याची जाणीव होते. आजच्या पिढीतील मुलांना आपल्या धर्माबद्दल काही माहित नाही यात नेमकी चूक कोणाची, त्यांची की त्यांच्या पालकांची? प्रत्येक पालकांनी आपल्या मुला-मुलींना लहानपणापासूनच किमान संध्याकाळी प्रार्थना म्हणण्याची सवय लावावी. आपल्या पुराणातील गोष्टी आणि सण-उत्सव या मागील इतिहास समजावून सांगावा. हिंदू धर्म कसा श्रेष्ठ आहे हे मुलांना शिकवण्याची गरज आहे.

शालिनी, गीतांजली बाहेर पडू शकल्या असत्या…

शालिनी आणि गीतांजली यांच्यावर आपल्या धर्माचे संस्कार झाले असते तर आसिफाच्या प्रश्नांना त्यांना उत्तरे देता आली असती. मात्र त्यांना उत्तरे देता आली नाहीत म्हणून त्यांच्यावर मुस्लिम धर्माची भीती निर्माण करून त्यांचे धर्मांतर करण्यात आसिफा यशस्वी झाली. ‘शरियत’ कायद्याच्या अधीन गेलेल्या या दोघी (शालिनी आणि गीतांजली) आपल्याच घरच्यांना ‘काफीर’ म्हणून हिणवतात. त्यानंतर या सर्व प्रकारामागील भयावह वास्तव समजल्यावर त्याच घरच्यांचा आसरा घेतात, ही गोष्ट फार अस्वस्थ करणारी आहे. धर्माप्रमाणे प्रेम या प्रकरणातही पालकांचे योग्य संस्कार महत्त्वाचे ठरतात. प्रेम ही एक अतिशय सुंदर गोष्ट आहे. प्रेमात पडणे यात काहीच चुकीचे नाही. प्रेम हे आंधळे असते असे शिकवण्यापेक्षा डोळसपणे प्रेम करा असा सल्ला आजच्या पिढीला देणे गरजेचे आहे. प्रेमात जात-धर्म यासारख्या गोष्टींना काही महत्व नसते असे म्हणतात. मग प्रेमासाठी हिंदू मुलींनीच आपला धर्म का बदलावा? मुस्लिम मुलगा त्याच्या प्रेमासाठी, त्या मुलीसाठी आपला धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारायला तयार आहे का? हे प्रत्येक मुलीने पडताळून घेणे गरजेचे आहे. (The Kerala Story Movie Review)

चित्रपट चांगल्या बदलाची सुरुवात : धर्म, प्रेम याप्रमाणेच घराघरातून ‘लैंगिक शोषण’ या विषयावर चर्चा झाली पाहिजे, म्हणजे मुली आकर्षण, खरे प्रेम आणि केवळ शारीरिक सुख यामधील फरक ओळखायला शिकतील आणि लव्ह जिहादसारख्या प्रकाराला आळा बसेल. मात्र असे असले तरीही भारतीय चित्रपटसृष्टीत ‘द काश्मीर फाईल्स’ आणि ‘द केरळ स्टोरी’ यांसारख्या संवेदनशील विषयावर चित्रपट येणे आणि तो पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी करणे ही देखील एका चांगल्या बदलाची सुरुवात म्हणता येईल. हा चित्रपट प्रत्येकाने विशेषतः तरुण मुलींनी बघायला हवाच.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.