26/11 Attack : १५ वर्षांनंतरही सुन्न करणा-या कटू आठवणी

110
  • विजय पवार

ती रात्र कधीच विसरता येणारी नाही. देशातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला त्या रात्री मुंबईवर झाला होता. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी गोळीबार करत एका रात्रीत १६६ निष्पाप लोकांचे जीव घेतले. छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावर दहशतवादी अजमल कसाबला गोळीबार करताना मी प्रत्यक्ष पहिले आहे. ही घटना आठवली तरी त्या आठवणींनी अंगावर शहारा येतो. या घटनेला आता १५ वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र हल्ल्यानंतरची मुंबई आणि आताची मुंबई यात प्रचंड बदल झाला आहे. आता मुंबई पोलीस विभाग अत्याधुनिक शस्त्रांसह सुसज्ज आहे. पोलीसही कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आणि सतर्क आहेत.

ती काळरात्र… मुंबईला हादरवणारा २६/११ चा दिवस… आजही त्या जखमा प्रत्येक मुंबईकर आणि भारतीयांच्या मनात कायम आहेत. आजही मागे वळून पाहिलं तर अंगावर काटा येतो. समुद्रमार्गाने आलेल्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मुंबईला वेठीस धरलं होतं. या हल्ल्यात सुमारे ७०० जण जखमी झाले होते. लोक घाबरून सैरावैरा पळत होते. त्यावेळी माझी ड्युटी ही मुंबईच्या आझाद मैदानात होती. तेव्हा लोकांना सावरावे की दहशदवाद्यांच्या पाठी धावावे अशी गोंधळवून टाकणारी आणि भयावह स्थिती मुंबईत निर्माण झाली होती. या दहशतवाद्यांनी हॉटेल ताज, नरिमन हाऊस, हॉटेल ओबेरॉय आपल्या ताब्यात घेतलं होतं. त्यांच्या बेछूट गोळीबारात सर्वाधिक मृत्यू हे छत्रपती शिवाजी टर्मिनस इथे झाले. तर हॉटेल ताजमध्ये दहशतवाद्यांनी ३१ जणांचा जीव घेतला.

(हेही वाचा Chine : चीनमध्ये पसरतोय भयंकर आजार; लहान बालके मोठ्या संख्येने रुग्णालयात दाखल)

अतिरेक्यांनी एक टॅक्सी बॉम्बने उडवली होती. पोलिसांना मदत म्हणून रॅपिड अॅक्शन फोर्स (आरपीएफ), मरिन कमांडो आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड (एनएसजी) कमांडो यांना पाचारण करण्यात आलं. परंतु अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांना तीन दिवस लागले. जवळपास ६० तास दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चकमक सुरु होती. दहशतवाद्यांनी मुंबईत डझनभर ठिकाणी हल्ले केले होते. चारपैकी दोन दहशतवादी अब्दुल रहमान बडा आणि अबू अली जवळच्या पोलीस चौकीसमोर क्रूड आरडीएक्स बॉम्ब पेरून टॉवर विभागाच्या मुख्य गेटवर पोहोचले. एके ४७, दारूगोळा आणि हातबॉम्बने सशस्त्र दहशतवादी लॉबी एरियात घुसले आणि त्यांच्या मार्गात येणाऱ्यांवर गोळीबार करत राहिले.

या हल्ल्यादरम्यान हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह अनेक पोलीस कर्मचारी हुतात्मा झाले. दहा दहशतवाद्यांपैकी एका दहशतवाद्याला जिंवत पकडण्यात पोलिसांना यश आलं. तुकाराम ओंबळे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या अंगावर गोळ्या झेलून कसाबला जिवंत पकडलं. परंतु तुकाराम ओंबळे हुतात्मा झाले. अजमल कसाबला जिवंत पकडल्यामुळेच आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आणण्यास मदत झाली.

या हल्ल्यानंतर केंद्रातील एनएसजी कमांडोंच्या धर्तीवर मुंबईत शक्तिशाली अशा शीघ्र कृती दल आणि फोर्स वनची स्थापना करण्यात आली. अतिरेकी हल्ला परतवून लावण्याचा नियमित सराव या पथकांकडून करण्यात येतो. तसेच मुंबई पोलीस दलाला अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, वाहने, सीसीटीव्ही यंत्रणा आणि यंत्रसामुग्रीने सज्ज करण्यात आले आहे तसेच बुलेट प्रूफ जॅकेटही देण्यात आली आहेत. १५ वर्षांपूर्वी जसा दहशतवादाचा प्रश्न गंभीर होता, तसाच तो आजही आहे. भारताने यापासून बोध घेत काही सुधारणा केल्याही, पण दहशतवादी हल्ले थांबत नाहीत. पठाणकोट, उरीनंतर सर्जिकल स्ट्राईक केला गेला, पण दहशतवाद्यांसोबतची लढाई अजून संपलेली नाही.

(लेखक ठाण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत.)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.