Crime : दुहेरी हत्याकांडातील आरोपीला ३० वर्षांनी ठोकल्या बेड्या

142
लोणावळा येथे एका बंगल्यात ३० वर्षांपूर्वी दाम्पत्याची हत्या करणाऱ्या आरोपीला मुंबईतील विक्रोळी येथून अटक करण्यात आली आहे. अटक आरोपीने आपल्या दोन सहकाऱ्याच्या मदतीने हत्या करून लूट केली होती. लोणवळा पोलिसांनी या प्रकरणात दोन जणांना अटक केली होती, तिसरा आरोपी फरार झाला होता त्याला अखेर मुंबई गुन्हे शाखा कक्ष ९च्या पथकाने अटक केली आहे.
अविनाश भीमराव पवार (४९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हा करतेवेळी अविनाश हा केवळ १९ वर्षांचा होता. लोणावळा शहरातील यशोदा बंगला, सत्यम सोसायटी येथे राहणारे दाम्पत्य धनराज कुरवा आणि धनलक्ष्मी कुरवा यांची ४ ऑक्टोबर १९९३ साली हत्या करण्यात आली होती, मारेकऱ्यानी हत्या केल्यानंतर बंगल्यात लूट करण्यात आली होती.
याप्रकरणी लोणावळा पोलिसांनी हत्या आणि जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून अमोल काळे आणि विजय देसाई या मारेकऱ्याना अटक करण्यात आली होती, परंतु मुख्य आरोपी अविनाश पवार हा फरार झाला होता. तो लोणावळा पोलिसांना मिळून येत नव्हता, तो विविध ठिकाणी वेगवेगळी नावे परिधान करून स्वतःची ओळख लपवून राहत होता.लोणावळा पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न करून देखील आरोपी मिळून येत नसल्यामुळे लोणवळा पोलिसांनी शोध घेणे थांबवले होते.
दरम्यान मुंबई गुन्हे शाखा कक्ष ९चे प्रभारी पोलिस निरीक्षक दयानंद नायक यांना गुप्त माहितीदारा कडून मिळालेल्या माहितीनुसार विक्रोळी परिसरात एक इसम मागील अनेक वर्षांपासून नाव बदलून राहत आहे, या माहितीच्या आधारे प्रभारी पोनि. नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि.किरण आहेर, दीपक पवार, सपोनि. उत्कर्ष वझे, महेंद्र पाटील, स्नेहल पाटील आणि पथकाने सापळा रचून अविनाश पवार याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने ३० वर्षांपूर्वी केलेला खुनाचा गुन्ह्याची कबुली दिली. अविनाश पवार हा नाव बदलून विक्रोळी टागोर नगर येथे पत्नी आणि मुलांसह राहण्यास होता, काही वर्षे गॅरेजमध्ये काम केल्यानंतर त्याने वाहन चालक म्हणून खाजगी वाहनावर नोकरी करीत होता अशी माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपासासाठी अटक करण्यात आलेल्या आरोपीची ताबा लोणावळा पोलिसांकडे देण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.