वडाळ्यात ६८ लाख किमतीचे चरस जप्त एकाला अटक

105

दुचाकीवरून चरसची तस्करी करणाऱ्या एकाला वडाळा पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तस्कराकडून पोलिसांनी सुमारे १७ किलो चरस हा अमली पदार्थ जप्त केला आहे. या चरसची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ६८ लाख रुपये किंमत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

( हेही वाचा : बेस्ट बसमध्ये वस्तू विसरलात? आता भरावे लागणार १४ टक्के शुल्क)

जाहिद टिपू सुलतान खान (२८) असे अटक करण्यात आलेल्या अमली पदार्थ तस्कराचे नाव आहे. जाहिद हा वडाळा परिसरातच राहत असून तो मागील काही वर्षांपासून अमली पदार्थची तस्करी करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वडाळा येथे एक व्यक्ती चरस हा अमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती वडाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद जाधव यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक उगले, पोलीस उपनिरीक्षक शरद खाटमोडे आणि पथकाने सोमवारी रात्री ११ वाजता सापळा रचून सुझुकी ऍक्सेस या दुचाकीवर येणाऱ्या संशयित इसमाला थांबवून हटकले असता, त्या इसमाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्याच्या जवळील बॅग तपासली, बॅगेत पोलिसांना चरस हा अमली पदार्थ सापडला.

वडाळा पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या जाहिद टिपू सुलतान खान या तरुणाला अटक करून त्याच्या विरोधात अमली पदार्थ विरोधी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याच्या जवळून १७, किलो चरस जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या चरसची किंमत ६८ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जाहिद हा मागील काही वर्षांपासून अमली पदार्थांची तस्करी करीत असून त्यासाठी तो दुचाकींचा वापर करीत असल्याचे चौकशीत समोर आले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.