Forensic Department : खोटी कागदपत्रे दाखवून आरोपीने केली फॉरेन्सिक विभागात १७ वर्षे नोकरी

113
Forensic Department : खोटी कागदपत्रे दाखवून आरोपीने केली फॉरेन्सिक विभागात १७ वर्षे नोकरी
Forensic Department : खोटी कागदपत्रे दाखवून आरोपीने केली फॉरेन्सिक विभागात १७ वर्षे नोकरी

राज्य शासनाच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळा (फॉरेन्सिक लॅब) मध्ये बोगस कागदपत्राच्या आधारावर १७ वर्षे नोकरी करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचे पितळ उघड पडले आहे. एक वर्षांपासून बेपत्ता असलेल्या या कर्मचाऱ्याची माहिती काढण्यात आली असता गेल्या वर्षी या कर्मचाऱ्याला गुजरात पोलिसांनी २००३ मध्ये झालेल्या एका खुनाच्या गुन्ह्यात अटक केली असल्याची माहिती समोर आले.

विजयसिंग सोलंकी असे या कर्मचाऱ्याचे नाव असून तो फॉरेन्सिक लॅब नाशिक विभागात एप्रिल २००५ पासून लिपिक म्हणून नोकरी करीत होता. त्याने शाळेची बोगस कागदपत्रे आणि पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट (पीसीसी) सादर केले होते त्यात त्याच्यावर कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नसल्याचे खोटे दाखवण्यात आले होते.विजयसिंग सोलंकी हा मूळचा गुजरात राज्यात राहणारा आहे. मागील एक वर्षांपासून तो कामावर येत नसल्यामुळे नाशिक येथील फॉरेन्सिक लॅबचे उपसंचालक राहुल पवार यांनी चौकशी केली असता त्याचा कुठेही थांगपत्ता लागत नसल्यामुळे नाशिक पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

नाशिक पोलिसांनी त्याच्या कागदपत्रावरून व त्याच्या मूळ गावी तपास केल्यानंतर असे आढळून आले की, गुजरात मध्ये २००३ मध्ये झालेल्या एका खुनाच्या गुन्ह्यात गुजरात पोलिसांना तो हवा होता. सप्टेंबर २०२२ मध्ये त्याला अटक करण्यात आली असून तो तेथील तुरुंगात असल्याची माहिती नाशिक पोलिसांनी फॉरेन्सिक लॅब नाशिकचे उपसंचालक यांना दिली. तसेच त्याने नोकरीच्या ठिकाणी दिलेले सर्व प्रमाणपत्र आणि पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट बोगस असल्याचे समोर आले. ही कागदपत्रे मुंबई कलिना येथील फॉरेन्सिक लॅब या ठिकाणी जमा केल्याप्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. वाकोला पोलिस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, “शालेय कागदपत्रे आणि बनावट पीसीसी प्रमाणपत्राच्या मदतीने सोलंकी २००५ मध्ये फॉरेन्सिक लॅबमध्ये लिपिक म्हणून रुजू झाला. १७ वर्षे नोकरी करण्यात तो यशस्वी झाला.”

(हेही वाचा – एल. बी. एस. मार्ग, घाटकोपर अंधेरी लिंक रोडचे रुंदीकरण: त्या रस्त्याच्या तातडीने सुधारणा)

वाकोला पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत उपसंचालक पवार यांनी म्हटले आहे की, “सोलंकी हा २००५ पासून संस्थेत लिपिक म्हणून काम करत होते. त्यांनी सप्टेंबर २०२२ मध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता काम करण्याचा अहवाल देणे बंद केले. काही आठवडे गैरहजर राहिल्यानंतर त्यांच्यासमोर एखादी दुर्दैवी घटना घडली असण्याची शक्यता असल्याने, फॉरेन्सिक लॅबचे तत्कालीन उपसंचालक, यांनी नाशिक पोलिसांकडे तक्रार करण्याची विनंती केली.” तपासाअंती, पवार यांनी पोलिसांना सांगितले की, नाशिकमधील स्थानिक पोलिसांनीच गुजरातमधील त्यांच्या समकक्षांकडून सोलंकीला गोध्रा येथे २००३ च्या एका खुनाच्या प्रकरणात अटक केल्याची माहिती दिली. न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत रुजू होण्यापूर्वी सोलंकीने हा गुन्हा केल्याचे कळताच तत्कालीन उपसंचालकांनी सोलंकीच्या भरती प्रक्रियेची चौकशी सुरू केली.

फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने अंतर्गत तपासणी केली आणि शोधून काढले की सोलंकीचे इयत्ता नववीचे मार्कशीट, त्याचा शाळा सोडल्याचा दाखला आणि त्याने फॉरेन्सिक लॅब मध्ये नोकरी सादर केलेले पोलिस क्लिअरन्स प्रमाणपत्र हे सर्व बनावट होते. गुजरातमधील शाळेच्या नोंदीनुसार, शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रावरील अनुक्रमांक दुसर्‍या विद्यार्थ्याचा होता. शिवाय, १९९४ मध्ये वर्गात केवळ ३९ विद्यार्थी असल्याची पुष्टी शाळेने केली असली तरीही, गुणपत्रिकेवरील रोल क्रमांक ४४ होता. एप्रिल २००५ मध्ये जारी करण्यात आलेला आणि महेलोल गावचे पोलीस अधीक्षकांनी स्वाक्षरी केलेला पीसीसी देखील बनावट असल्याचे आढळून आले,” असे पोलिसांनी सांगितले. गुजरात पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर सध्या तुरुंगात असलेल्या सोलंकीवर भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत फसवणूक आणि बनावटगिरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.