-
कल्याण : प्रतिनिधी
Kalyan : मेळा संघांचे गणपती मोहल्ल्यांतून विसर्जन मिरवणुकीने निघतात. अशावेळी जातीय तणाव आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पोलिसांकडून खबरदारी घेतली आहे. गणेशोत्सवाच्या शेवटच्या टप्प्यात शहरातील शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी कल्याण पोलिसांनी सोमवारी सायंकाळी बाजारपेठ परिसरात रूट मार्च करत शक्ती प्रदर्शन केले.
(हेही वाचा – Maharashtra Weather Alert : राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा; हवामान खात्याने ‘या’ जिल्ह्यांना दिला सतर्कतेचा इशारा )
विशेषतः मेळा संघांचे गणपती हे शहरातील विविध मोहल्ल्यांतून विसर्जन मिरवणुकीने निघत असल्याने अशावेळी कोणताही जातीय तणाव निर्माण होऊ नये, दोन गटात वाद होऊ नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा रूट मार्च काढण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कल्याण विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक होनमाने यांच्या नेतृत्वाखाली या रूट मार्चला सुरुवात झाली. बाजारपेठ पोलिस ठाण्यातून सुरू झालेला हा रूट मार्च कोकण मर्चंट बँक, दुधनाका, विजय लॉन्ड्री, गजानन महाराज मंदिर, पारनाका, श्री शंकर मंदिर, डीसीबी बँक या अत्यंत वर्दळीच्या आणि संवेदनशील समजल्या जाणाऱ्या मार्गावरून काढण्यात आला आणि पुन्हा बाजारपेठ पोलिस ठाण्याजवळ त्याचा समारोप करण्यात आला. या रूट मार्चमध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्यासह १८ पोलिस अधिकारी, १४९ अंमलदार, २९ एसआरपीएफचे जवान, ८ होमगार्ड, २ सीआर मोबाईल, २ पीटर मोबाईल आणि २ बीट मार्शल असे मोठे मनुष्यबळ सहभागी झाले होते. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या काळात बाजारपेठ, पारनाका, दुधनाका परिसरात मोठी गर्दी होते. या गर्दीचा गैरफायदा घेऊन समाजकंटकांकडून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न होऊ नये, यासाठी पोलिसांनी या संपूर्ण मार्गाची पाहणी करत नागरिकांना सुरक्षिततेची हमी दिली.
विशेष म्हणजे मेळा संघाच्या मिरवणुका रात्री उशिरापर्यंत चालतात आणि त्या अरुंद गल्ल्यांमधून जातात. अशावेळी डीजे, गुलाल आणि गर्दीमुळे किरकोळ कारणावरून वाद होण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने आधीच आपली कुमक आणि तयारी दर्शवली आहे. या रूट मार्चमुळे बाजारपेठ परिसरातील व्यापारी आणि स्थानिक रहिवाशांमध्ये समाधान व्यक्त होत असून विसर्जन मिरवणुका शांततेत आणि उत्साहात पार पडतील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

