Kalyan : भर पावसात प्लास्टिकच्या आडोशाला अंत्यविधी! स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर; महसूल अहवाल तहसीलदारांकडे सादर

13
Kalyan
Kalyan
  • कल्याण : प्रतिनिधी

Kalyan : कल्याण तालुक्यातील मौजे वासुंद्री येथील बौद्ध समाजाला मेल्यानंतरही मरणयातना भोगाव्या लागत असून भर पावसात प्लास्टिक कागदाच्या आडोशाखाली अंत्यविधी उरकण्याची वेळ येत आहे. वडिलोपार्जित स्मशानभूमीला छत आणि संरक्षक भिंत मिळावी ही अनेक वर्षांपासूनची मागणी प्रशासनाच्या उदासीनतेमुळे धूळखात पडली आहे.

वासुंद्री येथील सर्व्हे नंबर २८/१, २८/२, २८/३ व २९/१ या जमिनीवर बौद्ध समाजाची पूर्वापार दफनभूमी आहे. ही जागा गेल्या सुमारे १५० वर्षांपासून बौद्ध समाजाच्या ताब्यात आणि वापरात आहे. या जागेत अनेक कबरी तसेच मृतांच्या वारसांनी स्मरणार्थ बांधलेल्या समाधी आहेत. या जागेला धार्मिक आणि सामाजिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. मात्र येथे अंत्यविधीसाठी आवश्यक असलेल्या सोयी सुविधाच उपलब्ध नसल्याने पावसाळ्यात अंत्यविधी करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.

(हेही वाचा – “मग अडीच वर्षांतील ९० हजार कोटींचा हिशोब कोण देणार?” कुंभाच्या खर्चावरून BJP चा राऊतांवर पलटवार )

पाऊस थांबण्याची वाट पाहणे, ज्वलनशील साहित्याची व्यवस्था करणे तसेच पावसामुळे सरण भिजू नये म्हणून त्यावर प्लास्टिक पांघरणे अशा समस्या वारंवार निर्माण होत असल्याने उघड्यावरच अंत्यविधी करावे लागत असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे. या प्रकरणात तहसीलदार कार्यालयाकडून प्राप्त पत्राच्या अनुषंगाने वासुंद्री येथील बौद्ध स्मशानभूमीच्या जागेची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून ग्राम महसूल अधिकारी वासुंद्री यांनी पंचनामा केला आहे. उपलब्ध नकाशे व अधिकार अभिलेख तपासल्यानंतर ही जागा सर्व्हे क्रमांक २८/१, २८/२, २८/३ व २९/१ या दरम्यान असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले असून सदर स्मशानभूमीची जागा अंदाजे एक एकर असून जागेवर मोठ्या प्रमाणात कबरी असल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे.

या पाहणीसाठी संबंधित ७/१२ धारक, ग्रामपंचायत सदस्य तसेच पोलिस पाटील यांना उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले होते. यावेळी जमीर पावले यांनी सदर जमीन ही त्यांच्या माऊबंदकीची सामायिक मालकीची असल्याचे सांगत पाहणी व पंचनामा करण्यास हरकत घेतली. मात्र जागेची पाहणी आवश्यक असल्याचे समजावून सांगण्यात आल्यानंतर पोलिस पाटील हनुमान पंडित यांच्या समवेत प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. पाहणी दरम्यान ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्य तसेच बौद्ध समाजातील नागरिक उपस्थित होते. पंचनाम्यात ग्रामस्थांनी सांगितले की ही जागा गेल्या १०० वर्षांपासून बौद्ध समाजाच्या वापरात असल्याने शासनाकडून या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्यास समाजाची गैरसोय दूर होईल. दरम्यान ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी, पंचनामा व छायाचित्रांसह संपूर्ण अहवाल पुढील कार्यवाहीसाठी तहसीलदार कल्याण यांच्याकडे सादर केला आहे.

बौद्ध समाजाच्या म्हणण्यानुसार स्मशानभूमीच्या जागेवर त्यांच्या पूर्वजांचे देह दफन केलेले असल्याने या जागेला धार्मिक व सामाजिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. सदर जागेची अधिकृत नोंद करून ती बौद्ध समाजाच्या ताब्यात व वापरासाठी सुरक्षित ठेवावी, महसूल नियमानुसार ही जागा बौद्ध समाजाच्या नावावर नोंदवून त्यांचा हक्क व ताबा कायम ठेवावा, तसेच स्मशानभूमीसाठी आवश्यक असलेली शेड व संरक्षक भिंत तातडीने बांधून द्यावी अशी मागणी बौद्ध समाजाच्या वतीने कल्याण तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.