Pulkit Mani Noida Show Cancelled : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्री केल्यानंतर चर्चेत आलेला स्टँडअप कॉमेडियन पुलकित मणी आता पुन्हा चर्चेत आला आहे. इंदौरमधील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमानंतर दुसऱ्याच दिवशी त्याचा नोएडामधील कॉमेडी शो रद्द झाला आहे. पुलकितने सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली. विशेष म्हणजे, शो रद्द झाल्यानंतर त्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर ‘अब अंडरग्राऊंड होने का समय आ गया’ असं म्हटलं आहे.
राहुल गांधींसमोर केली मोदींची मिमिक्री
१९ सप्टेंबर रोजी इंदौरमध्ये ‘छात्रों की गूंज’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राहुल गांधी यांच्यासोबत पुलकित मणीनेही मंच शेअर केला. यावेळी त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोलण्याच्या शैलीची आणि सार्वजनिक कार्यक्रमांतील काही प्रसंगांची मिमिक्री केली. परदेशी नेत्यांसोबतच्या भेटी, ‘माय फ्रेंड’ या उल्लेखाचा संदर्भ तसेच मुलांसोबतच्या नाण्याच्या ट्रिकशी संबंधित प्रसंगांचा वापर करत त्याने विनोदी सादरीकरण केलं. कार्यक्रमातील त्याच्या मिमिक्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय चर्चेला सुरुवात झाली. या सादरीकरणावर भाजप नेत्यांनी आक्षेप घेत राहुल गांधी आणि पुलकित मणीवर टीका केली. त्यानंतर या कार्यक्रमावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.
दुसऱ्याच दिवशी नोएडातील शो रद्द
इंदौरमधील कार्यक्रमानंतर पुलकित मणीचा नोएडामधील कॉमेडी शो रद्द करण्यात आला. पुलकितने स्वतः सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. मात्र, शो रद्द करण्यामागचं अधिकृत कारण त्याने स्पष्ट केलेलं नाही. सोशल मीडियावर मात्र या निर्णयाबाबत विविध चर्चा सुरू आहेत. संभाव्य वाद किंवा कार्यक्रमादरम्यान निर्माण होणारी परिस्थिती लक्षात घेऊन शो रद्द करण्यात आला असावा, अशा चर्चा काही युजर्सकडून केल्या जात आहेत. मात्र, याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही.
‘अब अंडरग्राऊंड होने का समय आ गया’
शो रद्द झाल्यानंतर पुलकितने इन्स्टाग्राम स्टोरीवर ‘अब अंडरग्राऊंड होने का समय आ गया’ अशी पोस्ट केल्याचं समोर आलं आहे. या पोस्टमुळे त्याच्या शो रद्द करण्याच्या निर्णयाची चर्चा आणखी वाढली आहे. पुलकित मणी सोशल मीडियावर ‘HunnyWhoIsFunny’ या नावानेही ओळखला जातो. राजकीय व्यंग, मिमिक्री आणि सामाजिक विषयांवरील विनोदी सादरीकरणासाठी तो ओळखला जातो. सध्या इंदौरमधील कार्यक्रमातील मिमिक्रीमुळे निर्माण झालेला वाद आणि त्यानंतर नोएडा शो रद्द झाल्याने तो चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
Join Our WhatsApp Community
