गणपतीपुळे मंदिरात Dress Code सक्तीचा; केव्हापासून होणार अंमलबजावणी? वाचा…

नवीन नियमांनुसार, गुडघ्यापेक्षा वर असणारे तोकडे कपडे, शॉर्ट्स अथवा मिनी स्कर्ट परिधान करणाऱ्या भाविकांना मंदिर परिसरात  (Dress Code)  प्रवेश नाकारला जाईल.

9
कोकणातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील श्रीदेव गणपती मंदिरात आता १ जानेवारी २०२७ पासून भाविकांसाठी वस्त्रसंहिता (Dress Code) सक्तीची करण्यात येणार आहे. मंदिराचे पावित्र्य, संस्कृती आणि धार्मिक परंपरा जपण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ‘संस्थान श्रीदेव गणपतीपुळे’ देवस्थान ट्रस्टतर्फे देण्यात आली.

तोकड्या कपड्यांवर प्रवेशबंदी; लहान मुलांना सूट

नवीन नियमांनुसार, गुडघ्यापेक्षा वर असणारे तोकडे कपडे, शॉर्ट्स अथवा मिनी स्कर्ट परिधान करणाऱ्या भाविकांना मंदिर परिसरात  (Dress Code)  प्रवेश नाकारला जाईल. हा नियम पुरुष आणि महिला अशा दोघांनाही समान लागू राहील. तथापि, १० वर्षांखालील लहान मुलांना या नियमातून सूट देण्यात आली आहे. तसेच गुडघ्याखाली असणारे कपडे, स्कर्ट किंवा थ्री-फोर्थ्स घातलेल्या भाविकांना दर्शनासाठी कोणतीही अडचण येणार नाही, असे देवस्थानने स्पष्ट केले आहे.

प्रथम जनजागृती, आता काटेकोर अंमलबजावणी

संस्थानचे अध्यक्ष नीलेश कोल्हटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी या ड्रेस कोडची  (Dress Code)  प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात करण्यात आली होती. सुरुवातीला नियमांची माहिती नसल्याने काही भाविकांमध्ये नाराजी दिसून आली होती. त्यामुळे भाविकांमध्ये कोणताही संभ्रम राहू नये म्हणून गेल्या काही महिन्यांपासून जनजागृती मोहीम राबवण्यात आली. आता पुढील वर्षाच्या पहिल्या दिवसापासून या नियमांची मंदिरात कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. लहान मुलांचा अपवाद वगळता सज्ञान व्यक्तींनी धार्मिक स्थळी तोकडे कपडे घालणे शोभनीय नाही. मंदिराचे पावित्र्य राखणे ही सर्वांची जबाबदारी असून, भाविकांनी योग्य वेशभूषा करून सहकार्य करावे, असे आवाहन कोल्हटकर यांनी केले.

भाविकांची मोठी गर्दी

गणपतीपुळे येथे दरवर्षी साधारण २५ लाख भाविक भेट देतात. दररोज सरासरी १ हजार, तर संकष्टी आणि विनायकी चतुर्थीला ही संख्या पाच हजारांच्या घरात पोहोचते. या पार्श्वभूमीवर येणाऱ्या भाविकांसाठी देवस्थानतर्फे निवास आणि अन्नछत्राची उत्तम सोय उपलब्ध असल्याचेही ट्रस्टने स्पष्ट केले आहे. (Dress Code)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.