-
प्रतिनिधी
CM Devendra Fadnavis : राज्यातील अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीवरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून शेतकरी, शेतमजूर, पशुधन आणि ग्रामीण भागासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. या पत्रावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
यंदा राज्यातील अनेक भागांत अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने सोयाबीन, कापूस, बाजरी, मका, तूर, मूग आणि उडीद यांसारख्या पिकांवर परिणाम झाला आहे. पावसाअभावी शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे पवार यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन औपचारिक निकषांची प्रतीक्षा न करता दुष्काळ जाहीर करावा, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली आहे.
पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे एकूण नऊ मागण्या केल्या आहेत. शेतकऱ्यांना हेक्टरी किमान ५० हजार रुपये आणि शेतमजूर कुटुंबांना २५ हजार रुपयांची विशेष मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची तातडीने अंमलबजावणी करून पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रोत्साहनपर अनुदान ५० हजारांवरून एक लाख रुपये करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
(हेही वाचा – China Women Cricket : एकही चेंडू न खेळता चीन आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटमधून बाहेर; ‘हा’ नियम ठरला निर्णायक )
एक रुपयातील पीकविमा योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावी, गेल्या वर्षीच्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी जाहीर केलेली हेक्टरी १७ हजार रुपयांची मदत वितरित करावी, दुष्काळसदृश तालुक्यांत रोजगार हमीची कामे सुरू करावीत आणि फळबागांसाठी टँकरची व्यवस्था करावी, अशी मागणीही पवार यांनी केली आहे.
याशिवाय पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या गावांचे सर्वेक्षण करून टँकर सुरू करणे, मागणीनुसार चारा छावण्या सुरू करणे, पशुधनासाठी पाणी व पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करणे, वीज रोहित्रांच्या दुरुस्तीसाठी विशेष मोहीम राबवणे आणि परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य व जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करणे, या मागण्यांचाही पत्रात समावेश आहे. दुष्काळसदृश भागातील विद्यार्थ्यांचे केवळ परीक्षा शुल्क नव्हे तर संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणीही पवार यांनी केली आहे.
दरम्यान, शरद पवारांच्या पत्राला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारने परिस्थिती गांभीर्याने घेतली असल्याचे स्पष्ट केले. “शेतकऱ्यांना थेट मदत, पाणी आणि चाऱ्याची व्यवस्था करण्याचे नियोजन सुरू आहे; एनडीआरएफच्या मदतीची वाट न पाहता राज्य निधीतून तातडीने मदत केली जाईल,” अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली. तसेच पवार यांनी केलेल्या सूचनांचे स्वागत करत, सरकारकडून दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना आधीच सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

