-
प्रतिनिधी
Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात निर्माण झालेला पेच आणि अंतरवाली सराटी ते मुंबईपर्यंत निघालेल्या मोर्चाच्या हालचालींमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. उपोषण आणि आंदोलनाच्या पवित्र्यामुळे सरकारवर मोठा दबाव निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, मुंबईच्या वेशीवर पोहोचण्यापूर्वीच अचानक चर्चांच्या फैरी झडल्या आणि एकाएकी हे आंदोलन स्थगित करण्यात आले. ऐन मोक्याच्या क्षणी आंदोलन मागे घेतल्यामुळे सर्वसामान्यांपासून राजकीय वर्तुळापर्यंत अनेकांच्या भुवया उंचावल्या असून या निर्णयावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
(हेही वाचा – Manoj Jarange Hunger Strike End : सात समुद्रापार घडामोडी अन् महाराष्ट्रातील उपोषण संपलं; मध्यरात्री असं काय घडलं? )
दुसरीकडे, आरक्षणाच्या या लढ्याला सातत्याने आव्हान देणाऱ्या ओबीसी नेत्यांनी या घडामोडींवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवले होते. आंदोलनकर्त्यांच्या मागण्या, सरकारकडून दिली जाणारी आश्वासने आणि वारंवार बदलणाऱ्या भूमिकांवरून ओबीसी संघटना आधीपासूनच आक्रमक भूमिकेत होत्या. आंदोलनाच्या या पद्धतीमुळे केवळ समाजाची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप सातत्याने केला जात होता.
या संपूर्ण पार्श्वभूमीवर आता ओबीसी आंदोलक प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर अत्यंत जहरी शब्दांत हल्लाबोल केला आहे. जरांगे यांच्या उपोषण मागे घेण्याच्या निर्णयावर सडकून टीका करताना हाके म्हणाले की, मुंबईत गेल्यानंतर आपल्याला कोणीही भीक घालणार नाही, आपली डाळ तिथे शिजणार नाही आणि आंदोलनाचा फुगा फुटेल, ही खरी भीती मनात असल्यामुळेच मनोज जरांगे यांनी ऐनवेळी मुंबईचा दौरा रद्द करत उपोषण मागे घेण्याचे नाटक केले. हे आंदोलन म्हणजे निव्वळ नौटंकी असून जरांगेंचे हे उपोषण केवळ लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठीच होते, असा घणाघाती आरोप हाके यांनी केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

