Ganeshotsav 2026 : सातासमुद्रापार मराठी संस्कृतीचा डंका! डोंबिवलीच्या मखरात लंडनचा बाप्पा विराजमान

12
Ganeshotsav 2026 : सातासमुद्रापार मराठी संस्कृतीचा डंका! डोंबिवलीच्या मखरात लंडनचा बाप्पा विराजमान

Ganeshotsav 2026        सातासमुद्रापार लंडनमध्ये साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवात यंदा डोंबिवलीच्या कलाकारांच्या कौशल्याचा ठसा उमटला आहे. ‘महाराष्ट्र मंडळ, लंडन’च्या यंदाच्या ३६ व्या गणेशोत्सवासाठी डोंबिवलीतील प्रसिद्ध कलावंत मयूरेश आणि स्मिता गद्रे यांच्या संकल्पनेतून साकारलेली पर्यावरणपूरक ‘अष्टविनायक’ सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. कल्याण-डोंबिवलीतील कारागिरीचा आविष्कार थेट लंडनच्या मंचावर दिमाखात अवतरला असून, परदेशातही अस्सल मराठी संस्कृतीचा सुगंध दरवळला आहे. (Ganeshotsav 2026)

लंडनच्या महाराष्ट्र मंडळाच्या प्रशस्त सभागृहातील १६ x ८ फुटांच्या मुख्य मंचावर मध्यभागी साडेतीन फुटांची देखणी गणेशमूर्ती आणि तिच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी चार अशा आठ पॅनेल्सवर अष्टविनायकांचे स्वरूप साकारण्यात आले आहे. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर खुरजेकर आणि लंडनस्थित डोंबिवलीकर जैलेश देशपांडे यांनी १९९१ मध्ये सुरू केलेल्या या उत्सवाचे यंदा ३६ वे वर्ष आहे. जैलेश देशपांडे यांच्या पुढाकारातून आणि मंडळाचे अध्यक्ष वृषाल खांडके यांच्या सहकार्यातून जुलैच्या अखेरीस या प्रकल्पाची आखणी झाली. त्यानंतर अवघ्या तीन आठवड्यांच्या अविरत मेहनतीतून ही संपूर्ण कलाकृती प्रत्यक्षात उतरली. (Ganeshotsav 2026)

(हेही वाचा – वडनगरच्या भूमीतून विकसित भारताचा संकल्प; DCM Eknath Shinde यांच्याकडून पंतप्रधान मोदींच्या सेवायात्रेचा गौरव)

या सजावटीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचा पर्यावरणस्नेही बाज. लाकडी चौकटी, एमडीएफ, पुठ्ठा आणि हँडमेड कागदाचा सुरेख संगम साधत हा देखावा तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या पारंपरिक वास्तुकलेची साक्ष देणाऱ्या चिरेबंदी कामाचा आभास निर्माण करण्यासाठी लाल हँडमेड पेपरचा वापर झाला असून, तळाशी शिल्पांची नक्षी आणि वरती उजळलेला देखणा छज्जा साकारण्यात आला आहे. मोरगावच्या मयूरेश्वरापासून सुरू होऊन मोरगावलाच पूर्ण होणाऱ्या अष्टविनायक यात्रेच्या शास्त्रोक्त संकेतानुसार या पॅनेल्सची रचना करण्यात आली आहे. मुख्य गाभाऱ्यातील नगारखाना कापडी पडद्यांनी नटवला गेला, तर सुलेखनकार उमेश पांचाळ यांनी मूर्तीच्या पार्श्वभूमीवर चितारलेल्या अष्टविनायक श्लोकाच्या कॅलिग्राफीने या संपूर्ण देखाव्याला एक अलौकिक आणि प्रसन्न रूप प्राप्त करून दिले आहे. (Ganeshotsav 2026)

मयूरेश गद्रे यांच्या मूळ संकल्पनेला इंटिरिअर डिझायनर असलेल्या स्मिता गद्रे यांनी मंचाच्या अचूक मापनात कागदावर उतरवले. या कामात ॲड. हरीश चव्हाण यांनी संगणकीय डिझायनिंग, भगवान भंडारी यांनी लेसर कटिंग, तर रोहन ढवळे यांनी जोडणीत सहकार्य केले. डोंबिवलीत तयार झालेला हा सुटा देखावा लंडनमध्ये व्यवस्थित जुळवता यावा, हे यातील खरे आव्हान होते. त्यासाठी प्रत्येक भागावर तपशीलवार नोंदी करून तब्बल २१ पेट्यांमध्ये त्याचे नेटके पॅकिंग करण्यात आले. राखीपौर्णिमेच्या दिवशी रवाना झालेले हे साहित्य अवघ्या चार दिवसांत सुखरूप लंडनला पोहोचले आणि त्यानंतर व्हिडीओ कॉल्सच्या माध्यमातून स्थानिक कार्यकर्त्यांनी तो देखावा मंचावर उभा केला. कल्याणच्या ऐतिहासिक सुभेदार वाड्यातील गणेशोत्सवाचा दांडगा अनुभव आणि मखर निर्मितीतील कौशल्याच्या बळावर हा आंतरराष्ट्रीय प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याचे सांगत, गद्रे दाम्पत्याने मंडळाच्या पदाधिकाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. (Ganeshotsav 2026)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.