१५ मिनिटं पुस्तक वाचलं की मिळणार पैसे! काय आहे Singapore सरकारची ही भन्नाट योजना?

१५ मिनिटं पुस्तक वाचलं की मिळणार पैसे! काय आहे Singapore सरकारची ही भन्नाट योजना?

16
Singapore Pays People to Read Books
Singapore Pays People to Read Books

Singapore Pays People to Read Books : स्मार्टफोन, सोशल मीडिया आणि सतत पाहिल्या जाणाऱ्या रिल्समुळे लोकांची दीर्घकाळ वाचनाची तसेच लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर सिंगापूर (Singapore) सरकारने नागरिकांमध्ये पुन्हा वाचनाची सवय रुजवण्यासाठी अनोखा उपक्रम सुरू केला आहे. विशेष म्हणजे, दररोज १५ मिनिटे वाचन केल्यास नागरिकांना आभासी नाणी मिळणार असून, त्यांची पुढे रोख रकमेत रूपांतर करता येणार आहे.(Singapore Pays People to Read Books)

१५ मिनिटांच्या वाचनासाठी मिळणार २० व्हर्च्युअल कॉइन्स

सिंगापूरच्या पाच वर्षांच्या ‘राष्ट्रीय वाचन अभियानांतर्गत’ नागरिकांना दररोज किमान १५ मिनिटे वाचन करण्याचे प्रोत्साहन दिले जात आहे. वाचनाची वेळ सरकारी प्रणालीवर नोंदवल्यानंतर सहभागी व्यक्तीला २० आभासी नाणी (व्हर्च्युअल कॉइन्स) मिळतील. दिवसातून एकदाच वाचनाची वेळ नोंदवता येणार आहे. एखाद्या व्यक्तीने सलग ५० दिवस दररोज १५ मिनिटे वाचन केले, तर त्याच्या खात्यात एक हजार नाणी जमा होतील. या नाण्यांच्या बदल्यात १ सिंगापूर डॉलर म्हणजेच अंदाजे ७६ रुपये मिळू शकतात. यंदा सरकारने एकूण ७५ लाख वाचन मिनिटांचे उद्दिष्ट ठेवले असून, नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षिसांवर मोठी रक्कम खर्च केली जाणार आहे.

वाचनाला बनवलं ‘गेम’सारखं

सिंगापूरच्या नॅशनल लायब्ररी बोर्डाने या उपक्रमासाठी ‘गेमिफिकेशन’चा वापर केला आहे. नागरिक CrowdTaskSG या वेबसाइटवर दररोजच्या वाचनाची वेळ नोंदवू शकतात. ठरावीक वेळ वाचल्यानंतर त्यांना आभासी नाणी मिळतात आणि ही नाणी जमा झाल्यानंतर त्यांचे रोख बक्षिसात रूपांतर करता येते. या उपक्रमामागील मुख्य उद्देश लोकांना सतत फोनवर रील्स पाहण्यापेक्षा काही वेळ पुस्तक वाचनासाठी देण्यास प्रवृत्त करणे हा आहे.

नॅशनल लायब्ररी बोर्डाच्या प्रमुख मेलिसा टॅम यांच्या मते, छोटे व्हिडीओ माहिती झटपट उपलब्ध करून देतात; मात्र सतत मोठ्या प्रमाणात माहिती पाहिल्यामुळे मानसिक थकवा जाणवू शकतो. त्याउलट, पुस्तके आणि सविस्तर लेख वाचल्यामुळे एकाग्रता, विचार करण्याची क्षमता आणि कल्पनाशक्ती विकसित होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे वाचनाची सुरुवात अगदी १५ मिनिटांच्या छोट्या उद्दिष्टापासून करण्यात आली आहे.

तरुणांमध्ये ‘आनंदासाठी वाचन’ कमी

संशोधन विश्लेषक आयझॅक निओ यांच्या मते, मुले आणि तरुणांवर शिक्षण आणि परीक्षांचा मोठा दबाव असतो. त्यामुळे त्यांचे वाचन अनेकदा अभ्यासापुरतेच मर्यादित राहते. आनंदासाठी किंवा स्वतःच्या आवडीसाठी पुस्तक वाचण्याची सवय कमी होत असल्याचे ते सांगतात. तरुणांना पुन्हा पुस्तकांशी जोडण्याच्या उद्देशाने निओ यांनी २०२५ मध्ये ‘मॉडर्न मेन्स बुक क्लब’ सुरू केला. वाचनाकडे केवळ अभ्यासाचे साधन म्हणून न पाहता त्याचा आनंद घेण्यास तरुणांना प्रवृत्त करणे हा त्यामागील उद्देश आहे.

पैसे दिल्याने वाचनाची सवय लागेल का?

या उपक्रमाबाबत तज्ज्ञांमध्ये वेगवेगळी मतं आहेत. मानसशास्त्रज्ञ कॅरिसा एनजी यांच्या मते, ज्यांना वाचनाची आधीपासूनच थोडी आवड आहे, त्यांच्यासाठी आर्थिक बक्षीस अतिरिक्त प्रेरणा ठरू शकते. मात्र, ज्यांना वाचनाची अजिबात आवड नाही, त्यांच्यात केवळ पैशांच्या जोरावर दीर्घकाळ टिकणारी सवय निर्माण होईलच असे नाही. दुसरीकडे, पुस्तक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते सुरुवातीला मिळणारे प्रोत्साहनही उपयोगी ठरू शकते. एखादी व्यक्ती सुरुवातीला बक्षिसासाठी वाचन सुरू करेल आणि पुढे त्यातूनच तिला पुस्तकांची आवड निर्माण होऊ शकते.

त्यामुळे सिंगापूरच्या या योजनेचा उद्देश केवळ नागरिकांना काही रुपये देणे एवढाच नसून, स्मार्टफोन आणि रील्सच्या सततच्या वापरातून थोडा वेळ बाजूला काढून दररोज किमान १५ मिनिटे वाचन करण्याची सवय लावणे, हा आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.