- दर्शना हजारे
आई – ‘चार सूर्यनमस्कार घातल्याशिवाय
मी तुला आज मॅगी खाऊ देणार नाही ! ’
मुलगी- ‘जंक फूड खायचंय तर कशाला हवे
ते सूर्यनमस्कार ? अजून जाड हो ! ’
मुलगा- ‘ताई मी वडापाव, मॅगी खातो तर तू बर्गर,
पिझ्झा खातेस हाच काय तो फरक….!’
हे असे संवाद हल्ली घराघरात सहज ऐकू येत असतात. पण, हे जंक फूड (Junk food) म्हणजे नक्की काय ते आधी आपण जाणून घेऊया… जंक फूडला आपण ‘फास्टफूड’ म्हणूनही ओळखतो.
कॅलरीजने परिपूर्ण असणारे परंतु पौष्टिक मूल्य नगण्य असणारे असे हे खाद्यपदार्थ म्हणजेच जंक फूड होय. खूप जलद गतीने तयार होणारे हे खाद्यपदार्थ अशी जमेची बाजू असली तरीही या जंक फूडमध्ये चरबी, मीठ आणि साखर यांचे प्रमाण जास्त असते. परंतु, आपल्या शरीराला निरोगी ठेवण्याकरिता आवश्यक असणारे पोषक घटक, खनिजे आणि जीवनसत्वे मात्र या जंकफूडमध्ये अजिबात नसतात.
(हेही वाचा – EPFO Update: २५,००० रुपये वेतन असणाऱ्यांनाही घेता येणार पेन्शन योजनेचा लाभ, नवा नियम कधी लागू होईल? जाणून घ्या…)
भारतीय वैज्ञानिक संशोधन परिषद (ICMR) आणि राष्ट्रीय पोषण संस्था (NIN) यांच्या यंदाच्या अहवालानुसार गेल्या काही वर्षात जंक फूडच्या विक्रीत सुमारे १५० टक्क्यांची वाढ झाली आहे. ही वाढ एवढ्या प्रचंड प्रमाणात का झाली, हे आधी आपण समजून घेतले पाहिजे. जंक फूड (Junk food) एवढं लोकप्रिय होण्याचं प्रमुख कारण आपल्या भारतीयांची बदललेली जीवनशैली! आपले पारंपारिक खाद्यपदार्थ उच्च पोषण मूल्य युक्त असले तरीही भाजणे, उकडणे, आंबवणे या आणि अशा अनेक प्रक्रियेतून जात असल्यामुळे कदाचित ते तयार होण्यासाठी मात्र वेळ लागतो. एकत्र कुटुंब पद्धतीत घरातील स्त्रीवर्गाची हे पदार्थ बनवण्यासाठी मदत होत असे. परंतु हल्ली विभक्त कुटुंब पद्धतीत जेवण किती जलद आणि सहज तयार होईल यावर जास्त भर दिला जातो. नियोजित नसलेल्या कामाच्या वेळा, ताण, थकवा यामुळे ‘शॉर्टकट जेवण’ ही संकल्पना खूपच लोकप्रिय झाली आहे असं आपण म्हणू शकतो. खरंतर जेवण हे फक्त पोट भरण्यासाठी नसून ते आपल्या शारीरिक वाढीसाठी आवश्यक असतं. एका फोनवर किंवा मोबाईलवर ऑनलाईन ऑर्डर (Online order) आणि पेमेंट करून घरपोच आलेलं हे जंकफूड म्हणजे आजच्या तरुणाईच्या गळ्यातला ताईत आहे.
शारीरिक वाढ, पोषणद्रव्य दूर राहिलं यावेळी पोट भरणे महत्त्वाचं वाटणाऱ्या या तरुणाईला सहज उपलब्ध होणारे हे फास्ट फूड (Fast food) म्हणूनच प्रिय होत आहे. कच्च्या घटकांवर प्रक्रिया करून, चव वाढवण्यासाठी उत्पादनाचा साठवण कालावधी वाढवण्याकरिता अनेकदा शरीराला हानिकारक घटक ट्रान्स फॅट्स, हायड्रोजनेटेड तेल याचा वापर होत असतो. यामुळेच की काय लोकप्रिय झालेल्या या जंकफूडचा परिणाम उशिरा का होईना पण आपल्या शरीरावर होतोच. रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, हृदयाचे विकार आणि लठ्ठपणाच्या समस्या सतत वाढताना आपण पाहत आहोत. लठ्ठपणा आणि वाढणारे वजन या समस्या जर अशाच वाढत राहिल्या तर जगभरात २०५० सालापर्यंत २५ वर्षावरील सुमारे ३८० कोटी तरुणांचा यात समावेश होऊ शकेल. त्यावेळी जगातील निम्मी संख्या असणाऱ्या या तरुणांमध्ये आपण भारतातील किती जणांचा समावेश असेल याचा विचार न केलेलाच बरा!
आपण काय खायचं हे ठरवणं हा प्रत्येकाचा स्वतःचा वैयक्तिक निर्णय असतो. फक्त भूक भागवणारे कॅलरीयुक्त जंकफूड खाल्ल्यामुळे शरीराची ऊर्जा कमी होऊन जर सतत थकवा जाणवत असेल तर ते खावं अथवा खाऊ नये हा पण आपलाच निर्णय असायला हवा. हल्लीची तरुण पीढी आरोग्य विषयक जागरूक होताना आपण पाहत आहोत. ते नक्कीच सकारात्मक विचार करून या जंकफूडला किती महत्त्व द्यायचं ते ठरवण्याकरिता सक्षम आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

