-
प्रतिनिधी
Fraud पोलीस अधिकारी असल्याचे भासवून सामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा मुंबई गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. स्वतःला पोलीस उपायुक्त (DCP) आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) असल्याचे सांगून लोकांकडून लाखो रुपये उकळणाऱ्या तीन जणांच्या टोळीला गुन्हे शाखेने अटक केली आहे. अटक आरोपींमध्ये एका पिता-पुत्राचा समावेश आहे. (Fraud)
मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या पथकाला काही भामटे पोलीस अधिकारी असल्याचे भासवून लोकांची फसवणूक करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. एका तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून १० लाख रुपये उकळले होते, मात्र कर्ज मंजूर झाले नाही आणि पैसेही परत केले नाहीत. या तक्रारीची दखल घेत गुन्हे शाखा युनिट १ चे पोलीस निरीक्षक गणेश पिसाळ आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. (Fraud)
(हेही वाचा – Ghazi mumtaz : भारताच्या गुन्हेगाराचा खात्मा! 26/11 हल्ल्यातील दोषी आणि LeT कमांडर गाझी मुमताजचा संशयास्पद मृत्यू)
तक्रारदाराने या तोतया पोलीस अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी हॉटेल ‘द लीला’ येथे बोलावले. यावेळी गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून या तिन्ही भामट्यांना रंगेहाथ अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मोहम्मद गौस इब्राहिम खतीब (५४, ऊर्फ डॉ. राज खतीब), त्याचा मुलगा मशब खतीब आणि शाहिद कपाडिया अशी आहेत. यातील मोहम्मद खतीब आणि मशब हे साताऱ्यातील असून शाहिद कपाडिया हा कल्याणचा रहिवासी आहे. विशेष म्हणजे, अवघे नववीपर्यंत शिक्षण घेतलेला मोहम्मद खतीब लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी स्वतःला ‘डॉक्टर’ असल्याचे सांगत असे. आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी बनावट पोलीस ओळखपत्रेही जप्त केली आहेत. (Fraud)
तपासात असे समोर आले आहे की, हे त्रिकुट गेल्या १० वर्षांपासून अशा प्रकारे फसवणूक करत होते. वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचे खोटे सांगून हे लोक नागरिकांवर दरारा निर्माण करत, जेणेकरून कोणीही तक्रार करण्यास धजावणार नाही. अटक करण्यात आलेला शाहिद कपाडिया याच्यावर यापूर्वीच कस्तुरबा मार्ग, साकीनाका आणि खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. न्यायालयाने तिन्ही आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने आतापर्यंत किती लोकांची आणि किती कोटींची फसवणूक केली आहे, याचा अधिक तपास गुन्हे शाखा करत आहे. गुन्हे शाखेचे उपायुक्त राज तिलक रोशन यांनी या कारवाईबद्दल माहिती दिली असून, नागरिकांनी अशा तोतयांपासून सावध राहावे, असे आवाहन केले आहे. (Fraud)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

