Pune: राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत येरवडा येथील ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह’ येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इयत्ता अकरावी आणि बारावीच्या शाखांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी या वसतिगृहात प्रवेश दिला जाणार आहे. मागासवर्गीय आणि गरजू विद्यार्थिनींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
या वसतिगृहाची क्षमता ८५ विद्यार्थिनींची असून, अकरावी आणि बारावीच्या कोणत्याही शाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींना येथे प्रवेश मिळू शकतो. अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), विमुक्त जाती व भटक्या जमाती (व्हीजेएनटी), इतर मागास प्रवर्ग तसेच दिव्यांग आणि अनाथ मुलींना सरकारने निर्धारित केलेल्या टक्केवारीच्या नियमानुसार रिक्त जागांवर प्रवेश दिला जाईल.
अद्ययावत ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध
समाज कल्याण विभागातर्फे विद्यार्थिनींना मोफत निवास, भोजन, स्टेशनरी साहित्य, आंथरूण-पांघरूण यांसह दरमहा दीड हजार रुपये निर्वाह भत्ता दिला जातो. यासह विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र संगणक कक्ष आणि अद्ययावत ग्रंथालयाची सुविधाही उपलब्ध आहे.
प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज बंधनकारक
या वसतिगृहामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींनी https://hmasnew.mahait.org या अधिकृत संकेतस्थळावर आपले अर्ज भरावेत. अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी विद्यार्थिनी व पालकांनी कार्यालयीन वेळेत येरवडा येथील वसतिगृहाच्या गृहपाल एस. एन. शेलार यांच्याशी संपर्क साधावा. गरजू विद्यार्थिनींच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी समाज कल्याण विभागाने ही सुविधा उपलब्ध करून दिली असून, जास्तीत जास्त मुलींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community


