Pune Water Shortage : पुण्यात कधी येणार पाणी? सम-विषम तारखेनुसार पाणी कपातीचे नवे वेळापत्रक जारी 

234
Water Shortage
Water Shortage

यावर्षी पावसाचे वेळेवर आगमन न झाल्यामुळे पुणे (Pune) शहरात गंभीर जलसंकट निर्माण झाले आहे. खडकवासला धरण साखळीतील पाणीपातळी झपाट्याने खाली आल्यामुळे पुणे महानगरपालिकेने सोमवार, १५ जून २०२६ पासून संपूर्ण शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सम-विषम तारखेनुसार शहरात पाणीपुरवठ्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. पाणीकपातीचा अंमलबजावणीचा हा पहिलाच टप्पा असल्याने शहरातील अनेक भागांमध्ये पाणी मिळवण्यासाठी नागरिकांची मोठी धावपळ उडण्याची शक्यता आहे. उपलब्ध जलसाठा पुढील दोन महिने पुरवण्याचे मोठे आव्हान आता प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. (Pune Water Shortage)

(हेही वाचा – Amravati : महामार्गावरील वृक्षांना आग लावून तोडीचे षडयंत्र?; वृक्षप्रेमींकडून चौकशीची मागणी)

शेतकऱ्यांना पेरण्या पुढे ढकलण्याचे आवाहन

पुणे महापालिका क्षेत्राला प्रामुख्याने खडकवासला धरणसाखळीतून पाणीपुरवठा केला जातो. याशिवाय पूर्व पुण्याला भामा आसखेड धरणातूनही पाणी पुरवले जाते. यंदा १५ जून उजाडला, तरी शहरात पावसाने हजेरी लावलेली नाही. यंदाच्या वर्षी ‘एल निनो’ सक्रिय असल्याने देशात पर्जन्यमान कमी राहणार असल्याचे हवामान विभागाने पूर्वीच स्पष्ट केले आहे. लांबलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही शेतकऱ्यांना पेरण्या पुढे ढकलण्याचे आवाहन केले आहे. उपलब्ध पाणीसाठा ऑगस्टपर्यंत पुरेल असे नियोजन करण्याच्या सूचना सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आल्या आहेत.

सध्या महापालिका धरणांतून दररोज सुमारे १६०० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी उचलते. कपातीनंतर हा पुरवठा दररोज सुमारे ११०० ते १२०० एमएलडीपर्यंत आणण्याचे उद्दिष्ट आहे. सम-विषम तारखेनुसार पाणीकपातीचे वेळापत्रक पालिकेच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. भामा-आसखेड प्रकल्पातून पाणीपुरवठा होणाऱ्या उत्तर-पूर्व भागाला तांत्रिक अडचणींमुळे सध्या या कपातीच्या नियोजनातून वगळण्यात आले आहे.

कारवाईचा इशारा

पाणीटंचाईचा गैरफायदा घेऊन नागरिकांची अडवणूक किंवा कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या टँकरचालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

(हेही वाचा – Bhimashankar Temple दर्शनासाठी खुले, ऑनलाईन पास अनिवार्य; कुठे कराल नोंदणी?)

नागरिकांना आवाहन

नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. 

नळ-टाक्यांची गळती तातडीने दुरुस्त करावी. 

अनधिकृत नळजोडांची माहिती पालिकेस द्यावी. 

पाण्याच्या टाक्या ओव्हरफ्लो होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. 

तक्रारींसाठी १८००-१०३०-२२२ या कॉल सेंटरवर संपर्क साधावा.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.